Makar Sankranti Shubh Muhurat 2023 : मकर संक्रात...महिलांपासून मुलांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा सण. नववधूसाठी तर हा सण खास. कारण महाराष्ट्रात नववधूला हलव्याचे दागिनी घालून तिला सजवलं जातं. लहान मुलांची लूट केली जाते. त्यालाच बोरन्हाण असंही म्हटलं जातं. तर लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत पंतग उडविण्यासाठी रस्सीखेच सुरु असते. पण अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, हा सण कधी साजरा करायचा. कारण 14 जानेवारी म्हणजे शनिवारी उद्या संध्याकाळी सूर्य मकर राशीत येतं आहे. त्यामुळे हा सण 14 की 15 जानेवारी नेमका कधी साजरा करायचा. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी आणि उपाय. (When is Makar Sankranti on 14th or 15th January makar sankranti 2023 date Shubh Muhurt pooja vidhi and upay marathi news)
तुम्हाला माहिती आहे, सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या संक्रमणाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. 14 जानेवारी म्हणजे शनिवारी उद्या संध्याकाळी सूर्य मकर राशीत येतं आहे. दरवर्षी मकर संक्राती हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी होणार आहे. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्त.
14 जानेवारी रोजी रात्री 8.21 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल.
मकर संक्रांती पुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटे ते 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत
एकूण कालावधी: 5 तास 14 मिनिटं
महापुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटं ते 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत
महापुण्य कालावधी: 2 तास.
मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर आंघोळ करा. काळे तिळ आणि गंगाजल मिसळलेल्या पाण्याने यादिवशी आंघोळ करा. शास्त्रानुसार असं केल्याने सूर्यदेवता प्रसन्न होते असं म्हणतात. तसंच कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, गूळ, लाल फुलं, अक्षता इत्यादी टाकून ओम सूर्याय नमः मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
या दिवशी गोरगरिबांना दान करणे खूप शुभ मानलं जातं. या दिवशी दान केल्याने शुभ फळ प्राप्त मिळतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. या दिवशी खिचडी खाण्याचीही परंपरा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या सणाला खिचडीचे पर्व म्हणूनही ओळखलं जातं. तर महाराष्ट्रात तिळाची गोड पोळी करण्याची प्रथा आहे. तिळ घालून भाकरीही करण्याचीही परंपरा आहे.
मकर संक्रातीबद्दल पौराणिक कथादेखील आहे. या कथेनुसार मकर संक्रांत हा पिता-पुत्राच्या अनोख्या मिलनाचा सण मानला जातो. या कथेत असं सांगितलं आहे की, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. म्हणून या सणाला महत्त्व आहे. याशिवाय अजून एक पौराणिक कथा आहे, ती म्हणजे मकर संक्रांत हा दिवस भगवान विष्णूचा असुरांवर विजय साजरा करण्याचा दिवस आहे.
तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला, असं म्हणायची महाराष्ट्रात प्रथा आहे. यामागे असं सांगितलं जातं की, जुन्या आठवणी विसरून तीळ आणि गूळ यांचा गोडवा नात्यात आणायचा. याशिवाय यामागे एक वैज्ञानिक कारणदेखील आहे. जानेवारी हा कडक थंडीचा ऋतू आहे. अशावेळी थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी तीळ गूळ खाल्ला जातो. त्यामुळे शरीराला उष्णता प्राप्त होते.