Kinkrant 2023 : सूर्यानं मकर राशीत प्रवेश केला आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. (Makar sankranti 2023) मकर संक्रांतीच्या या मंगल दिनी अनेकांनीच आप्तेष्टांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कुटुंबीयांसमवेत गोडाधोडाच्या बेतानं हा दिवस साजरा केला. यंदाच्या वर्षी मकर संक्रांतीला आयती सुट्टी असल्यामुळं सणाचा उत्साह जरा जास्तच होता. आता हेच आनंदाचे दिवस थेट (Rathasaptami date) रथसप्तमीपर्यंत पाहायला मिळतील. घरोघरी महिला वर्गाकडून हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात येईल. या साऱ्यामध्ये एका दिवसाला विसरुन चालणार नाही. तो दिवस म्हणजे किंक्रांत. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस (आज) किंक्रांत (Kinkrant) म्हणून ओळखला जातो. आता तुम्ही म्हणाल संक्रांतीशी यमक जुळणाऱ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय?
असं म्हणतात की संक्रांती देवीकडून मकर संक्रांतीच्या बरोबर दुसऱ्याच दिवशी किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध झाला. देवीनं या असुराच्या तावडीतून प्रजेला मुक्त केलं म्हणूनच हा दिवस किंक्रांत नावानं ओळखला जातो. करिदिन असंही याचं आणखी एक नाव. या दिवशी कोणतीही शुभकार्य केली जात नाहीत. पण, या दिवशी हळदीकुंकू मात्र आयोजित केलं जातं. (what is Kinkrant 2023 next day of makar sankranti reasons for the celebration significance)
किंक्रांतीचा दिवस हा एका अर्थी अशुभ असल्यामुळं या दिवशी काही गोष्टी प्रकर्षानं टाळण्याचा सल्ला दिला जातो. अर्थात सध्याच्या दिवसांमध्ये त्या कितपत पाळता आणि टाळता येतील यावर न बोललेलंच बरं. पण, तरीही ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे त्या मंडळींकडून मात्र याबाबतची काळजी घेतली जाते.
- शुभकार्यासाठी सहसा हा दिवस निवडू नये. या दिवशी असणाऱ्या शुभकार्यांमध्ये प्रचंड अडथळे येतात.
- गावखेड्याच्या ठिकाणी या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नयेत.
- भोगीच्या दिवसाची शिळी भाकरी असल्यास ती आज खावी, ते लाभकारी असेल.
- घरातून केर काढण्याआधी महिलांनी वेणीफणी करावी. मोकळ्या केसांनी ही कामं करू नयेत.
- आजच्या दिवशी घरात कटकट करु नका. सर्वांशी मधुर वाणीत बोला.
- काही ठिकाणी प्रवास करणं टाळा.
- आजच्या दिवशी देवीची पूजा करुन तिला गोडाचा नैवेद्य दाखवा.
महाराष्ट्रात किंक्रांतीच्या दिवशी या गोष्टी पाळल्या जातात. दक्षिण भारतात याच दिवसाला 'मट्टू पोंगल' या नावानं ओळखलं जातं. या दिवशी गोठ्यात असणाऱ्या गाई- बैलांना अंघोळ घालून त्यांना गोडाचं जेवण दिलं जातं. शिंगांवर बेगड लावून त्यांना सजवलं जातं. आजच्या दिवशी त्यांच्याकडून कोणतीही कामं करवून घेतली जात नाहीत. खेड्यापाड्यात विशेषत: दक्षिणेकडे आजच्या दिवशी दारात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. ज्यावर शेणाचे गोळे ठेवून त्याची पूजा करत तिथं प्रार्थना केली जाते.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)