वटसावित्रीच्या पूजेला 'हा' श्लोक नक्की म्हणा

Vatsavitri 2024 : जेष्ठा महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हणतात. हिंदू शास्त्रामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया या, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, अशी आख्यायिका सांगीतली जाते. 

Updated: Jun 20, 2024, 04:29 PM IST
वटसावित्रीच्या पूजेला 'हा' श्लोक नक्की म्हणा   title=

वटवृक्षाची आयुष्य मर्यादा जास्त असते, वड आणि पिंपळासारख्या डेरेदार वृक्षांची मुळं पाणी धरुन ठेवतात. या झाडांमुळे जमिनीखाली पाणी मुरतं. त्याचबरोबर वडाचं झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करतं. त्यामुळे या झांडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वडाच्या झाडाला पुजलं जातं, असं शास्त्रीय कारण आहे. असं म्हणतात की, वटपौर्णिमेचं व्रत हे पुर्वीच्या काळी तीन दिवस केलं जायचं. वडाच्या सावलीत सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून मिळवले, म्हणूनच लग्न झालेल्या स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात. असं म्हटलं जातं की, वडाच्या झाडामध्ये सृष्टीचे पालनकर्ते ब्रम्हा, विष्णू आणि महेश वास करतात. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या वडाच्या झाडाला मोठं महत्त्व दिलं जातं. वटपौर्णिमेचं व्रत करताना त्याचं सोहळं जपणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 

अश्वपती नावाचा एक राजा होता. धन-धान्याने समृद्ध असलेल्या या राजाला मुलबाळ नव्हतं. तेव्हा त्याने देवी सावित्रीची उपासना केली. देवी सावित्रीने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिलं. सावित्रीच्या आशिर्वादाने झालेली कन्या म्हणून त्याने त्याच्या मुलीचं नाव सावित्री ठेवलं. या सावित्रीचं रुप अतिशय तेजस्वी असल्याने कोणी राजकुमार तिच्याशी विवाह करण्यास पुढे येत नसे. त्यामुळे सावित्रीने आपल्या वर शोधण्याचं ठरवलं. त्यानंतर सावित्रीने राजा द्युमत्सेन याचा पुत्र सत्यवान याच्याशी विवाह करण्याचं ठरवलं. हे नारदमुनींना कळताच त्यांना फार वाईट वाटलं. सत्यवानाचा विवाह झाल्यानंतर वर्षभरातचं त्याचा मृत्यू होईल असं विधीलिखित होतं. हे सगळं झुगारुन तिनं सत्यवानाशी विवाह केला, आणि चातुर्याने यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले. 

वट सावित्रीची व्रतातील श्लोक 
सावित्री ब्रम्हसावित्री सर्वदा प्रियभाषिणी |
तेन सत्येन मां पाहि दु:ख-संसार-सागरात् |
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |  
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि || 

वटसावित्रीच्या व्रतात फक्त सावित्री देवीचीच नाही, तर शिव पार्वतीची देखील पूजा केली जाते. ज्या प्रकारे महादेव पार्वती आजन्म एकरुप झाले त्याचप्रमाणे माझं सैभाग्य आणि माझं कुटुंब आरोग्याने आणि धन धान्याने समृद्ध रहावं म्हणून ही श्लोक व्रताच्या वेळी म्हटला जातो.