मुंबई : हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आपण झाडूच्या वापराने घर स्वच्छ करतो. झाडू घराबाहेरील कचऱ्यात असलेली अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकते. त्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. वास्तुशास्त्रात झाडू खरेदी करणं, घरात ठेवणं आणि जुना झाडू घरापासून वेगळा ठेवणं असे अनेक नियम दिले आहेत.
ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार तज्ज्ञांकडून जाणून घेऊया झाडू कुठे ठेवावा, जुन्या झाडूचे काय करावं आणि कोणत्या दिवशी फेकून द्यावं, कोणत्या दिवशी नाही.
जर तुमच्या घराचा झाडू जुना झाला असेल आणि तो तुटला असेल तर तो ताबडतोब घरातून काढून टाकावा. कारण जुना झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आणतो. तुटलेला झाडू वापरणं टाळा कारण ते घरातील समस्या वाढवण्याचं काम करतं.
घरातून जुना किंवा तुटलेला झाडू टाकण्यासाठी सर्वात योग्य दिवस शनिवार आणि अमावस्या मानला जातो. याशिवाय ग्रहणानंतर आणि होलिका दहनानंतर तुटलेली आणि जुनी झाडू घरातून बाहेर काढू शकता. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा झाडूने बाहेर पडते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
तुमच्या घराचा जुना आणि तुटलेला झाडू टाकण्यासाठी त्यावर कोणी पाय ठेवू शकणार नाही अशी जागा निवडा. झाडू नाल्यात किंवा कोणत्याही झाडाजवळ फेकू नका. झाडूही जाळू नये.
गुरुवार, शुक्रवार आणि एकादशीला घराबाहेर झाडू टाकू नये. असं केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात आर्थिक संकट सुरू होतं.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)