Gauri Pujan 2022 : भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन (Gauri Pujan 2022) करतात. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणूनच यांना ज्येष्ठागौरी म्हणतात. याचपार्श्वभूमीवर जाणून घ्या ज्येष्ठा गौरीचे आवाहनाची वेळ व पूजा विधी...
अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते. यंदा ३ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन व ५ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. ४ सप्टेंबर गौराईचे पूजन केले जाणार आहे.
ज्येष्ठा गौरी आवाहन पूजा मुहूर्त
ज्येष्ठा गौरी आवाहन मुहूर्त शनिवार, 3 सप्टेंबर 2022 - सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6.41 पर्यंत
ज्येष्ठा गौरी पूजन रविवार, 4 सप्टेंबर 2022
ज्येष्ठा गौरी विसर्जन सोमवार, ५ सप्टेंबर २०२२
अनुराधा नक्षत्र 2 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11.47 पासून सुरू होईल.
अनुराधा नक्षत्र 3 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 10:57 ला संपेल
ज्येष्ठा गौरी विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता करतात. दारावर रांगोळी काढतात. घर फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी सजवतात. देवीसाठी नवीन कपडे, सौभाग्याचे दागिने,घालून देवीला नटवले जाते. गौरीला प्रसन्न करण्यासाठी आरती आणि भजनाचा कार्यक्रमसुद्धा केला जातो. स्त्रीया सहसा हिरव्या बांगड्या आणि हिरवी साडी घालतात जी अत्यंत शुभ मानली जाते.
गौरी पूजनाची पद्धत
महाराष्ट्रात गौरी पूजनाची पद्धत घरोघरी वेगवेगळी आहे. काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात, तर काही कुटुंबांमध्ये पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकारा खडे आणून त्यांची पूजा केली जाते.
काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात आणि उतरंडीला साडी-चोळी नेसवून त्याची पूजा करतात.काही ठिकाणी राशीच्या गौरी असतात. म्हणजेच घरातील गहू, तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे.
काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मुळं म्हणजेच गौरींची पावले असे म्हटले जाते.तिला नटवून, सजवून तिची पूजा केली जाते.