Ganseh Visarjan 2023: अनंत चतुर्दशीला (Ananta Chaturdashi) बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाचे विसर्जन केले जाते. यंदा अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे. मुंबईत बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले आहे. तर, मुंबईतील चौपाट्यांवरही विसर्जनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचवेळी बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्र किनारी कधी जावे, हीदेखील महापालिकेने जारी केले आहे. (Ganesh Viserjan At Mumbai)
आनंद चतुर्दशीच्या दिवशी समुद्राला सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती असेल. तर संध्याकाळी 5.08 वाजता 0.73 मीटरची ओहोटी असेल. तसेच, रात्री 11.24 वाजता 4.48 मीटर उंचीची भरती असेल. त्यामुळं याकाळात विसर्जनासाठी जात असताना खबरदारी घ्यावी, असं अवाहन करण्यात आलं आहे.
लालबागच्या राजासह अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतीचे दुसऱ्यादिवशी पहाटे विसर्जन करण्यात येते. अनेक ठिकाणी लालबागच्या राजाचे विसर्जन झाल्यानंतर इतर घरगुती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळं दुसऱ्या दिवशी कधी भरती ओहोटी असेल हेदेखील महापालिकेने स्पष्ट केले आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 5.15 मिनिटांनी 0.56 मीटरची ओहोटी आणि सकाळी 11.37 वाजता 4.71 मीटरची भरती असेल. संध्याकाळी 5.49 वाजता 0.36 मीटरची ओहोटी असेल. या भरती व ओहोटीदरम्यान विसर्जनासाठी चौपाट्यांवर येणाऱ्या भाविकांनी सतर्क राहावे, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईतील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेकडून पूर्वतयारी सुरू आहे. विसर्जनासाठी येणारे वाहन, चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीत पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यांवर 468 स्टील प्लेट तसंच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी 46 जर्मन तराफ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
चौपाटीवर येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीकोनातून 764 जीवरक्षकांसह 48 मोटरबोटी तैनात करण्यात आल्या आहेत. भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्यात जमा करण्यासाठी 150 निर्माल्य कलशांसह 282 वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.