मुंबई : एखाद्या मित्राचा वाढदिवस असला की सध्या तो रात्री 12 वाजता सेलिब्रेट केला जातो. इतकंच नव्हे तर जाणं शक्य नसेल तर आपण रात्री 12 वाजता फोन करून किंवा मेसेज करून शुभेच्छा देतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का मध्यरात्री वाढदिवस साजरा करणं किंवा कोणतंही शुभ कार्य करणं धार्मिक शास्त्रांमध्ये निषिद्ध मानलं जातं.
फार कमी लोकांना याबाबत माहिती आहे की, रात्री वाढदिवस साजरं करणं किंवा शुभ काम करणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामागे काय कारण आहे आणि आपण का काळजी घेतली पाहिजे.
बहुतेक वेळा असं पहायला मिळतं की, अनेकजण वाढदिवस 12 वाजता म्हणजे निशिथ काळातमध्ये साजरा करतात. निशिथ काळ रात्री 12 ते 3 वाजल्या दरम्यानचा वेळ असतो. सामान्य लोक याला मध्यरात्र असं म्हणतात. धर्मग्रंथानुसार, हा काळ अदृश्य शक्ती, भूत आणि पिश्चांचाचा काळ असतो. यावेळी या शक्ती खूप बळकट होतात.
शास्त्रानुसार आपण कुठे राहतो त्या ठिकाणी अशा बर्याच शक्ती आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत. असं असूनही, ते आपल्यावर विपरित परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत केक कापून, दारूचं सेवन आणि मांस खाल्ल्याने अदृश्य शक्ती एखाद्या व्यक्तीचं वय आणि भविष्य कमी करतं असं मानलं जातं.
सनातन धर्माच्या शास्त्रानुसार, वाढदिवस साजरा करण्यासाठी जळती मेणबत्ती विझवणं म्हणजे असुरांना आवाहन मानले जाते. मध्यरात्री राक्षसी शक्तींचं वर्चस्व असतं आणि त्यांसाठी अनुकूल वातावरण मिळताच ते संबंधित लोकांवर प्रहार करण्याची शक्यता असते.
हिंदू शास्त्रानुसार, दिवसाचा प्रारंभ सूर्योदयानंतर होतो. म्हणूनच, या काळात वातावरण शुद्ध आणि सकारात्मक असतं. त्यामुळे सूर्योदयानंतरच एखाद्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. रात्री वातावरणात रज-तम कणांचं प्रमाण खूप जास्त असतं. त्या वेळी दिलेले अभिनंदन किंवा शुभेच्छा फलदायी होण्याऐवजी अशुभ होतात.