Dasara 2023 Ravana In Laws Celebration: देशभरामध्ये दसरा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. देशात अनेक ठिकाणी लंकाधिपति रावणाच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं. मात्र मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यामध्ये रावणाची पूजा केली जाते. मंदसौरमधील खानपुरा येथे रावणाचा भव्य पुतळा आहे. या ठिकाणी शेकडो वर्षांपासून रावणाची पूजा करण्याची परंपरा आहे. येथील नामदेव समाज लंका नरेश रावणाची पत्नी मंदोदरीला आपली बहीण मानतो. त्यामुळेच या ठिकाणी रावणाला जावयाप्रमाणे मानसन्मान दिला जातो.
दसऱ्याच्या काही आठवडे आधीपासूनच खानपुरा येथील नगरपालिकेच्या माध्यमातून रावणाच्या पुतळ्याची साफसफाई करुन त्याची रंगरंगोटी केली जाते. या पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसराचेही शुशोभिकरण केलं जातं. या ठिकाणी स्थानिक प्रशासनच रोषणाई करतं. दसऱ्याच्या दिवशी सकाळी लोक या ठिकाणी रावणाची पूजा करतात. ढोल-ताशांच्या गजरात रावणाची विधीवत पूजा केली जाते. रावणाला दसऱ्यासाठी सासुरवाडीकडून निमंत्रित केलं जातं. या ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जात नाही. तर रावणाचा केवळ वध या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी केला जातो.
नामदेव समाजामध्ये अशी मान्यता आहे की वाईट गोष्टीही नष्ट केल्या पाहिजे. रावण एक महान विद्वान होता आणि त्यामुळेच त्याची पूजा येथील लोक करतात. रावणाला या ठिकाणी जावयाप्रमाणे सन्मान दिला जातो. त्यामुळेच येथील महिला डोक्यावर पदर घेऊनच रावणाच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. केवळ रावणाची पूजा केली जाते असं नाही तर त्याच्या पायामध्ये लाल धागाही बांदला जातो. हा लाल धागा बांधल्याने कोणत्याही असाध्य रोगापासून संरक्षण होतं अशी येथील मान्यता आहे.
मंदसौदमधील खानापुरा येथील नामदेव समाजातील लोकांचं असं माननं आहे की त्यांचे पूर्व राजस्थानमधून या ठिकाणी स्थायिक झाले. आमचे पूर्वज आधीपासूनच मंदोदरीला आपली बहीण मानायचे. त्यामुळेच रावण आमचा जावई आहे. मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे आम्ही मागील अनेक पिढ्यांपासून स्थायिक असलो तरी आम्ही जावयासंदर्भातील ही परंपरा आजही सुरु ठेवली आहे, असं येथील लोक सांगतात.
राजस्थानमधील जोधपूरमधील मंडोर येथे मंदोदरीचं माहेर होतं. रावणाने याच ठिकाणी मंदोदरीबरोबर लग्न केलं. त्यामुळेच या ठिकाणी रावणाची जावई म्हणून पूजा केली जाते. येथील लोकां रावणामधील चांगल्या गुणांचं कौतुक करतात आणि त्याच्याबद्दल मनात श्रद्धा बाळगतात.