Sankashti Chaturthi July 2022: आषाढ कृष्ण संकष्टी चतुर्थी व्रत; जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थीचा उपवास हा भगवान गणेशासाठी केला जातो. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी 16 जुलैला आहे. 

Updated: Jul 13, 2022, 12:51 PM IST
Sankashti Chaturthi July 2022: आषाढ कृष्ण संकष्टी चतुर्थी व्रत; जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ title=

Sankashti Chaturthi: हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हिंदू मान्यतेनुसार कोणतंही शुभ कार्य करण्याआधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. गणपतीला सर्व देव-देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान आहे. भगवान गणेश आपल्या भक्तांवरील सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात, म्हणूनच त्याला विघ्नहर्ता आणि संकट मोचन असेही म्हणतात. हिंदू धर्मात देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी पुष्कळ उपवास केले जात असले तरी, संकष्टी चतुर्थीचा उपवास हा भगवान गणेशासाठी केला जातो. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी 16 जुलैला आहे. 

संकष्टी चतुर्थी म्हणजे काय?

संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटावर मात करणारी चतुर्थी. संकष्टी हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे, ज्याचा अर्थ 'कठीण प्रसंगातून सुटका करणे' असा होतो. या दिवशी मनुष्य आपल्या दुःखांपासून मुक्त होण्यासाठी गणपतीची पूजा करतो. पुराणानुसार चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणे फार फलदायी असते. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात. संकष्टी चतुर्थीला पूर्ण विधीपूर्वक गणपतीची पूजा केली जाते.

संकष्टी चतुर्थीचे महत्व

संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता राहते. असे म्हटले जाते की गणेशजी घरात येणारी सर्व संकटे दूर करतात आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण करतात. चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन देखील खूप शुभ मानले जाते. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर संपते. 

संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

या दिवशी उपवास ठेवा. घरात दिवा लावावा. गणेशाचं गंगाजलाने अभिषेक करा. त्यांना फुले, दुर्वा अर्पण करून सिंदूर लावा. मोदकांचा नैवेद्य द्या. गणपतीचं ध्यान करा आणि आरती करावी. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यावर उपवास सोडावा.

पंचांग
आषाढ - कृष्ण पक्ष - चतुर्थी तिथि - शनिवार
नक्षत्र - धनिष्ठा
महत्वपूर्ण योग - आयुष्मान
चंद्रोदय- रात्री 9 वाजून 53 मिनिटांनी
चंद्राचं कुंभ राशीत मार्गक्रमण

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)