पुणे: विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून नशीब आजमवणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना असणारा स्थानिक विरोध अद्याप मावळलेला नाही. या मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये ब्राह्मण विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला होता. तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध उमेदवार देण्याचा इशारा दिला होता.
या सगळ्या घडामोडींनंतर शनिवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून परिपत्रक काढून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. यावेळी ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांची बैठक झाल्याचेही सांगितले जात होते.
मात्र, यानंतर काहीवेळातच पुन्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून आपण अद्याप चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आमच्या संघटनेचे प्रवक्ते आनंद दवे यांनी परस्पर चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिल्याचे परिपत्रक काढले. परस्पर असे पत्रक काढल्याबद्दल दवे यांची संघटनेतून हकालपट्टी केली जाईल, असे गोविंद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे कोथरूडच्या मतदारांमधील संभ्रम आणखी वाढण्याची शक्यता आहे. याठिकाणी विरोधकांकडून एकमताने मनसेच्या किशोर शिंदे यांच्या पाठिशी ताकद उभी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे दीपक शामदीरे, तर संभाजी ब्रिगेड पार्टीतर्फे सोनाली ससाणे यांच्यासह अपक्ष मिळून एकूण ३३ जणांनी कोथरूडमधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची चिंता कायम आहे.