जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा ?

 जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा

Updated: Sep 6, 2020, 09:38 AM IST
जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा ? title=

पुणे : पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये ४० डॉक्टर स्टाफ, ८० नर्सिंग स्टाफचा समावेश आहे. राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. 

दोन दिवसांपूर्वी जम्बो मध्ये सुविधांचा अभाव असल्याची ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली होती. औषध साठा, उपचार सामुग्रीचा पुरवठा होत नसल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बैठकीनंतरच राजीनामा दिल्यानं आरोग्य प्रश्नासमोरील पेच वाढला आहे. 

पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून कोरोनाबाधितांची संख्या १ लाखांवर गेली आहे. कोरोना संकटाचा सामना एकजूटीने कसा होईल, यावर चर्चा केल्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसंच नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं असून पुणेकरांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही जावडेकर यांनी केलं आहे. मास्कबाबत जनजागृतीची गरज असल्याचंही ते म्हणाले. मास्क न लावल्यास पाचशे रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास हजार रुपये दंड असल्याचं जावडेकर म्हणाले. 

कोरोनाची चैन तोडणं गरजेचं आहे. कन्टेंन्मेंट झोनमध्ये अँटिजेन टेस्ट वाढवण्याची गरज असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. कोरोनाला हरवण्यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. जनजागृतीसाठी गणपती मंडळ, नवरात्र मंडळ आणि इतर अनेक सामाजिक संस्थांची मदत घेणार असल्याचं ते म्हणाले. तसंच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय गरजेचा असून सर्व यंत्रणा एकत्र मिळून काम करतील, कोरोना संबंधित प्रत्येक गोष्टीचे ताजे अपडेट सर्व यंत्रणांमार्फत दिले जाणार असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.