पुणे: मावळ मतदारसंघातील जनतेने अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा नाकारला. आम्ही पार्थ पवार यांना ओळखत नाही, हे जनतेने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांमध्ये मी मतदारसंघात काम केले होते. माझा जनसंपर्क चांगला होता. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच दोन लाखांच्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास मला होता. मावळच्या जनतेने हा विश्वास सार्थ ठरवला असून त्यांनी अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा नाकारला आहे. मावळमध्ये पवार घराण्यातील उमेदवार लादल्याचा राग लोकांच्या मनात होता. त्यामुळेच लोकांनी आम्ही पार्थला ओळखत नाही, हे दाखवून दिले. केवळ हुकूमशाही आणि पैशांच्या जोरावर जिंकता येत नाही, हे जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवून दिल्याचे बारणे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्यापासूनच श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात मोठी आघाडी घेतली. सध्याच्या घडीला पार्थ पवार दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. हा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे बारामती मतदारसंघात सुरुवातीच्या सत्रातील पिछाडी भरत काढत सुप्रिया सुळे यांना आता भक्कम आघाडी घेतली आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या धक्कादायक पराभवामुळे बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा तितकासा उत्साह पाहायला मिळत नाही.