धुळ्यात शेतपीकाला गारपीटीचा तडाखा, रस्त्यावर गारांचा खच...रब्बी पिकांचं अतोनात नुकसान

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : राज्यातील शेतकऱ्यावर (Farmer) अस्मानी संकट कोसळलं आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) गहू, कांदा, द्राक्ष पिकाला मोठा फटका बसलाय. गहू पिक पूर्णपणे आडवं पडलंय. द्राक्ष मण्यांवरही परिणाम झालाय. तर आधीच कांद्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. त्यात आता कांदा पिकांनाही फटका बसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. दुसरीकडे मराठवाड्यासह काही भागात गारपीट (Hailstones) होण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच पुढचे 3 दिवस म्हणजेच 8 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं (Meteorological Department) वर्तवलाय.

Mar 06, 2023, 19:23 PM IST
1/7

शेतकऱ्याला गारपीटीचा तडाखा

राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असतानाच आता शेतपिकाला गारपीटीचाही तडाखा बसला आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यातील खोरी टीटाने या भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. अक्षरश: लिंबूच्या आकाराएवढ्या गारांचा वर्षाव झाला.

2/7

गारपीटीने उभ्या पिकाचं नुकसान

या गारपीटीमुळे साक्रीतल्या खोरी टीटाने भागात शेतात, रस्त्यावर गारपीटीची चादर पसरली होती. घराच्या छतावर मोठमोठया गारा पडत होत्या. रस्ते पांढराशुभ्र गारांनी व्यापून गेले होते. 

3/7

शेतात-रस्त्यावर गारपीटीचा खच

गारपिटीनं अक्षरशा पिकांना भुईसपाट केलंय. शेतात आणि रस्त्यावर गारांचा खच पडलाय. त्यामुळे पिकांना फार मोठं नुकसान झालंय. तब्बल तासभर ही गारपीट चालली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय.

4/7

मोठ्या प्रमाणावर गारपीट

या गारपिटीमुळे गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. 

5/7

गव्हाचं पीक आडवं

दुसरीकडे सलग दोन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे  नाशिक, मनमाड, पिंपळगाव, येवला सटाणा कळवण परिसरातील शेती मातीमोल झाली. गव्हाचं पीक आडवं झालंय. गव्हावर  डाग पडल्यामुळे त्याला भाव मिळण्याची शक्यता कमी आहे...

6/7

केळी-द्राक्ष पिकाला फटका

अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकालाही फटका बसला आहे. द्राक्षांची विक्री नुकतीच सुरू झालेली असताना अवकाळी पावसानं द्राक्ष बागांमध्ये तयार झालेल्या द्राक्षांचा गोडवा एकाच रात्रीतून हिरावून घेतलाय. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं द्राक्ष बागांमध्ये पाणी साचलं. मुळांना पाणी लागल्यामुळे आता द्राक्षांची वाढ पूर्णपणे खुंटणारेय.

7/7

अहमदनगरमध्ये अवकाळी पाऊस

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावलीये. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. या अवकाळी पावसानं शेती पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय.