भारतीय कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी रस्त्यावर, मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टर्स
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतर (Jantar Mantar) या ठिकाणी गेले एक महिना उपोषणाला बसलेल्या भारतीय कुस्तीपटूंची (Indian Wrestlers) धरपकड करत पोलिसांनी त्यांना तिथीन हटवलंय. पण यानंतरही भारतीय कुस्तीपटूं आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आता तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी देखील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला असून त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. तर इथं मुंबईत युथ काँग्रेसने सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) घराबाहेर पोस्टर्स चिकटवली आहेत.
1/6
भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंना समर्थनार्थ समोर आल्या आहेत. कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पार्टीने (TMC) कोलकाताच्या रस्त्यावर पायी मोर्चा काढला. यात ममता बॅनर्जीही सहभागी झाल्या होत्या.
2/6
ब्रिजभूषण शरण सिंह भाजप नेता असल्याने त्यांना अटक केली जात नाही. देशासाठी ही लाजारवाणी गोष्ट असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीसाठी आमचा आंदोलन सुरु राहिल, आम्हाला आमच्या खेळाडूंवर गर्व आहे असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. इतकंच नाही तर आमचे कार्यकर्ते कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी जाणार असल्याचंही ममता बॅनर्जींनी सांगितलं.
3/6
मुंबईतही युथ काँग्रेसच्यावतीने निदर्शनं करण्यात आली. बुधवारी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिन तेंडुलकरच्या मुंबईतल्या घराबाहेर पोस्टर चिटकवलं. यात सचिनने कुस्तीपटूंच्या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पोस्टर लावताच मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हे पोस्टर काढून टाकलं.
4/6
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही भारतीय कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित महिला कुस्तीपटूंच्या मागण्यावर लक्ष द्यावं असं आवाहन केलं आहे. ज्या महिला कुस्तीपटूंवर आम्हाला गर्व आहे, ज्या महिला कुस्तीपटूंना देशाच्या मुली मानतो, ज्यांच्या मेहनतीमुळे देशाला कुस्तीत अनेक पदकं मिळालीत, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं असं राज ठाकरे यांनी केली आहे.
5/6
त्याआधी मंगळवारी भारतीय कुस्तीपटूंनी आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कुस्तीपटू आपली सर्व पदकं घेऊन हरिद्वार इथं पोहोचले. पण शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी समजूत घातल्यानंतर कुस्तीपटूंनी आपला निर्णय मागे घेतला. या प्रकरणी सरकारने लक्ष घालावं यासाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
6/6