भारतीय नौदलाने 11 इराणी, 8 पाकिस्तानी ओलिसांची केली समुद्री चाच्यांपासून सुटका, पहा शौर्याचे Photos

Indian Navy : भारतीय सेनेचे सामर्थ्य आण शौर्य संपूर्ण जगाला माहित आहे. आता आणखी एका घटनेत भारतीय नौदलाच्या जवानांनी आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ समुद्री चाच्यांनी ओलिस ठेवलेल्या काही नागरिकांची भारतीय नौदलाच्या जवानांनी मोठ्या शौर्याने सुटका केली.

| Feb 02, 2024, 20:06 PM IST
1/7

भारतीय नौदलाच्या युद्धनौका INS शारदाला 31 जानेवारी 2024ला सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ इराणी नौकेवर समुद्री चाच्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली.  नौदलाने तातडीने समुद्रात इराणच्या एफव्ही ओमारी बोटीचा मागोवा घेतला. (छायाचित्रे: भारतीय नौदल)

2/7

ओमारी बोटीचं लोकेशन मिळाल्यावर आयएनएस शारदा युद्धनौका ओलिस बोटीच्या दिशेने वेगाने पुढे सरकली. चाच्यांनी मच्छिमारांना दोन दिवसांपासून ओलीस ठेवले होते. 2 फेब्रुवारी 2024 रोजी शारदा या भारतीय युद्धनौकेने त्यांच्या बोटीला घेराव घातला.

3/7

भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टने सर्वात आधी बोटीची खातरजमा केली. त्यानंतर नौदलाच्या स्पीड बोटीने कमांडोंनी वेगाने ओमारी बोटीकडे कूच केली. भारतीय कमांडोंना येताना पाहून समुद्री चाच्यांनी हात वर केले. त्यानंतर भारतीय कमांडोजेने ओमारी बोटीचा ताबा घेत बोटीवरील 11 ईराणी आणि 8 पाकिस्तानी ओलिसांची सुटका केली.

4/7

भारतीय कमांडोंनी सर्व सात सोमाली समुद्री चाच्यांना अटक केली. सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी, भारतीय नौदलाच्या युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात (IOR) सतत तैनात केल्या जातात. 2008 पासून, भारतीय नौदलाने आखातात आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर चाचेगिरी विरोधी गस्तीसाठी कमोंडोंच्या अनेक तुकड्या तैनात केल्या आहेत.

5/7

भारतीय नौदलाने आतापर्यंत एकूण 3,440 जहाजे आणि 25,000 हून अधिक खलाशांची सुटका केली आहे. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी प्रादेशिक आणि अतिरिक्त-प्रादेशिक नौदलासोबत सक्रियपणे संलग्न आहे.

6/7

मच्छिमारांच्या बोटी समुद्री चाच्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय नौदल 25 भागीदार देश आणि 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करत आहे. नौदलाला या प्रकरणांबाबत रिअल टाइम माहिती सतत मिळत असते.

7/7

भारतीय समुद्री क्षेत्रातील सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आखात, उत्तर/मध्य अरबी समुद्र आणि सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर तैनात करण्यात आल्या आहेत.