नाशिक : नाशिक-शिर्डी महामार्गावर आज पहाटेपासून तीन अपघाताची मालिका पाहायला मिळाली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तसेच बुलडाणा येथे मध्यरात्री झालेल्या अपघातात चार जण ठार झालेत. नाशिक-शिर्डी महामार्गावर पहाटेच्या सुमारास एका कारला गँस टँकरने धडक दिली. त्यानंतर ती कार टँकरसह रसत्याच्या खाली उतरली. या कारमधील तीन जण जखमी झालेत. याच टँकरने आणखी एका कारलाही धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले.
दरम्यान दुसऱ्या एका अपघातात आयशर टेम्पो रसत्यावर उलटला. तर एक रिक्षाही रसत्याच्या खाली जाऊन पलटी झाली. गँस टँकर आणि दोन कारमध्ये झालेल्या अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरनजीक अंजनी खुर्द येथे नागपूर औरंगाबाद मार्गावर बोलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झालेत.
मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात झाला. अद्याप मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.