नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी बुधवारी नाशिकमध्ये शाळेतील मुलींची छेड काढणाऱ्या तरुणांना चोप दिला. शालिमार परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याठिकाणी असणाऱ्या एका शाळेतील मुलींची काही तरूण छेड काढत होते. या छेडछाडीला कंटाळून शाळेतील मुलींनी मनसेच्या स्थानिक कार्यालयात तक्रार केली.
यानंतर मनसेचे स्थानिक पदाधिकारी मनोज घोडके आज कार्यकर्त्यांसह शाळेच्या परिसरात आले. तेव्हा छेड काढणारे तरुण त्यांच्या हातात सापडले. यानंतर मनोज घोडके यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना चांगलाच चोप दिला.
राजमुद्रेचा वापर भोवणार? मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस
तसेच भविष्यात कोणीही छेड काढल्यास मुलींनी मनसेच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. अनेकांनी मनसेच्या या कृतीचे कौतुक केले आहे. मात्र, यामुळे मनसे थेट कायदा हातात घेत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता पोलीस यासंदर्भात काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.