www.24taas.com, प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई
निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होणार याचा अंदाज बांधणं एक कला आहे. आकडेवारी, लोकांचा कल, प्रचाराची पद्धत, उमेदवारांची पार्श्वभूमी याबरोबरच लोकांची नस तुम्हाला समजायला हवी.
मी मला आलेला अनुभव सांगतो.
लोकसभा निवडणूक 1998, पुणे लोकसभा मतदारसंघ.
रिंगणात काँग्रेसतर्फे विठ्ठल तुपे. भाजप-सेनेच्या पाठिंब्यावर पुणे विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सुरेश कलमाडी आणि भाजपनं तिकिट नाकारलेले अविनाश धर्माधिकारी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात. तेव्हा सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झालेल्या नव्हत्या. राहुल आणि प्रियंका राजकारणापासून दूर होते. शरद पवार काँग्रेसमध्येच होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म व्हायचा होता. काँग्रेसचे अध्यक्ष होते सीताराम केसरी !
पुण्यात तेव्हा कलमाडींची हवा होती. पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात. क्रीडा विश्वावर कलमाडींचा वरचष्मा. पुण्यात जे काय व्हायचे त्याचा निर्णय कलमाडी हाऊसवर व्हायचा. कर्वेरोडला लागून असलेलं दोन मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचं केंद्र होतं. कार्यकर्ते तिथं जमायचे. कलमाडी विमानतळावर यायचे तेव्हा त्यांच्या स्वागताला जणू जत्रा भरायची. कलमाडी आपल्या केबीनमध्ये झुलत्या खुर्चीत बसून सूत्र हलवायचे, तिथूनच पदांचे वाटप व्हायचे, असा तो काळ. कलमाडींचा पुणे फेस्टिवल म्हणजे डोळे दीपवणारा अनुभव असायचा. हेमा मालिनीपासून अमरीश पुरींपर्यत ते गुरुदास मानपासून जगजितसिंग पर्यंत सगळे तिथं यायचे. प्रायोजकांची कमी नव्हती कारण कलमाडी सत्तेत होते. काँग्रेस हाऊसचं महत्व कमी होऊन कलमाडी हाऊसचं महत्व वाढल्याची चिंता खऱ्या काँग्रेसजनांना होती. विठ्ठलराव गाडगीळ आणि त्यांचा गट याविरुद्ध आवाज उठवायचा. आता अनंत गाडगीळ हा वारसा चालवात. तर कलमाडी गट जोरात होता.....
पण दिल्लीची हवा ओळखण्यात तरबेज असलेल्या कलमाडींनी उडी मारली. काँग्रेस कमजोर झाली आहे असा त्यांचा समज झाला. मग कलमाडींनी बंड केलं आणि ते बाहेर पडले. भाजप-सेनेच्या पाठिंब्यावर अटल बिहारी वाजपेयींचे हात मजबूत करायला सुरेश कलमाडींनी उमेदवारी जाहिर केली! काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुणे विकास आघाडीही स्थापन केली होती.. पुण्याचा विकास करायचा आहे... हे त्याचं प्रत्येक भाषणात पालुपद असे. कलमाडी बाहेर पडल्यानंतर पुणे काँग्रेसची सगळी सूत्र शरद पवारांनी हाती घेतली. आपले विश्वासू हडपसरचे विठ्ठल तुपे यांना पवारांनी रिंगणात उतरवले. एकेकाळी पवारांनींच राजाकारणात पुढे आणलेल्या कलमाडींना धुळ चारण्याचा विडाच शरद पवारांनी उचलला. कलमाडी गेले तरी काहीच फरक पडत नाही, पुण्यात काँग्रेस लढेल आणि विजयी होईल असा विश्वास कार्यकर्त्यांना देत पवारांनी पुणे पिंजून काढायला सुरवात केली.
तर दुसरीकडे कलमाडींचा वारू चौफेर उधळला होती. पुण्याचा विकास करायचाय...पुणे विकास आघाडीच्या सुरेश कलमाडींना मत द्या... वाजपेयींचा हात मजबूत करा... असा नारा गल्लोगल्ली दिला जात होता. अटलबिहारी वाजपेयींनी कलमाडींसाठी सभाही घेतली. त्यात त्यांनी कलमाडींना विजयी करण्याचं आवाहन करण्याबरोबरच अविनाश धर्माधिकारींनी उमेदवारी मागे घ्यावी असं आवाहनही धर्माधिकारींचं नाव न घेता केलं.(धर्माधिकारींनी निवडणूक का आणि कशी लढवली तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) शिवसेनेनं मात्र कलमाडींना पाठिंबा देतांना खास ठाकरी शैलीत दणके दिले. पाठिंबा मिळवण्यासाठी मातोश्रीवर गेलेल्या कलमाडींना...’तिकडून बेडकासारखी उडी मारुन इकडे आलात.. विजयी झाल्यावर पुन्हा उडी मारुन तिकडे जाऊ नका…. ‘ असा दमच बाळासाहेबांनी कलमाडींना भरला... कलमाडी आणि बेडूक अशी तुलना करुन बाळासाहेबांनी विरोधकांना एक मुद्दाच मिळवून दिला...
सुरेश कलमाडी समर्थकांसाठी कलमाडी निवडून आल्यात जमा होते. पुण्यात भाजप-सेनेची हुकमी तीन सव्वातीन लाख मतं होती. कलमाडींसोबत पुणे महानगरपालिकेतले जवळपास पन्नास नगरसेवक होते. प्रत्येकाची दोन हजार मतांची ताकद जरी धरली तरी लाखभर मतं त्यांनी मिळवून दिले असते. आणि कलमाडी यांनी आपल्या खास तंत्राचा वापर करुन काही मतं नक्कीच खेचली असती... म्हणजे चार-साडेचार लाख मतांचा हिशोब तयार होता... कलमाडी समर्थकांच्या मते निवडणूक सहज होती...
तर दुसरीकडे शरद पवारांनी आपली सगळी ताकद विठ्ठल तुपेंच्या मागे उभी केली होती. विठ्ठल तुपेंची प्रतिमाही चांगली होती. काँग्रेस परंपरेतला म