www.24taas.com, प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई
बीड जिल्ह्यातील दरडवाडी या एका खेडयातून सुरु झालेला वामन केंद्रेंचा प्रवास आता नवी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ अर्थात राष्ट्रीय नाटय विद्यालयाच्या विशाल प्रांगणात विस्तारतो आहे. वामन केंद्रे म्हणजे मराठी मातीतले अस्सल नाटयकर्मी आणि अभ्यासक. एनएसडीच्या संचालकपदी वामन केंद्रे यांची निवड झाल्याचं जाहीर होताच पहिली प्रतिक्रिया होती ती आनंदाची. एका सच्च्या रंगकर्मीला योग्य संधी मिळाली असल्याची भावना नाटयप्रेमींमध्ये होती. एका मराठी रंगकर्मीची निवड या पदावर होण्याची ही पहिलीच वेळ होती. वामन केंद्रे एनएसडीचेच विद्यार्थी. एकेकाळी जिथे विद्यार्थी म्हणून वावरले त्याच एनएसडीमध्ये आता वामन केंद्रे संचालक झाले आहेत. दरडवाडी, मुंबई ते आता नवी दिल्ली…एक एक पाऊल टाकत वामन केंद्रे पुढे चालले आहेत…
वामन केंद्रे म्हटले की आठवतं, ‘झुलवा’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘नातीगोती’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘रणांगण’, ‘राहिले दूर घर माझे’ चे दिग्दर्शन… वामन केंद्रे म्हणजे सतत नवे नवे प्रयोग. नवे आयाम. नवी झेप. आपल्या रंगपीठ संस्थेतर्फे त्यांनी एकाच संचात तीन भाषेतलं नाटक सादर केलं. ‘प्रिया बावरी’ मराठीत, ‘मोहे पिया’ हिंदीत तर ‘ओ माय लव्ह’ इंग्रजीत.. असा प्रयोग यापूर्वी तरी कोणी सादर केला नव्हता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठीही त्यांनी ‘लडी नजरीया’ आणि ‘जानेमन’ ही नाटके दिग्दर्शित केली. संगीत नाटक अकादमी हा मानाचा पुरस्कारही त्यांना नुकताच मिळाला. त्यापाठोपाठ एसएसडीचे संचालकपद…
सन्मान आणि जबाबदारी
गेली दहा वर्षे वामन केंद्रे मुंबई विद्यापीठाच्या ‘अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स’चे संचालक आहेत. शून्यातून हा विभाग उभा करत तो केंद्रेंनी नावारुपाला आणला. अनेक विद्यार्थी घडवले. एनएसडीचे संचालक झाल्याची बातमी आली आणि मग केंद्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. वामन केंद्रे यांनी भेटण्यासाठी मुंबई विद्यापाठीतल्या कलिना कॅम्पसकडे पावलं वळली. ‘केंद्रे सरांकडे जायचं आहे होय ? असे पुढे जा आणि डावीकडे वळा. पुढेच आंबेडकर भवन….’ झुपकेदार मिशा असलेल्या टोपी घातलेल्या सुरक्षा रक्षकाच्या बोलण्यातून वामन केंद्रे यांच्याबद्दलची आपुलकी डोकावत होती. केंद्रे यांनी किती तळापर्यंत लोकसंपर्क साधला होता त्याची ती पावतीच होती. पावसाळी हवेत झाडांमधून मार्ग काढत एक एक इमारत मागे आंबेडकर भवन गाठलं. आंबेडकर भवनाच्या दारात केंद्रेंनीच स्थापन केलेल्या ‘अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी स्वागताला उभा होता.
आपले सर एनएसडीचे संचालक झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. दुस-या मजल्यावर ‘अकादमी ऑफ थिएटर ऑर्ट्स’मध्ये वामन केंद्रे यांची केबीनमध्ये फुलांचे गुच्छ स्वागत करत होते. विद्यार्थी आणि हितचिंतक, वामन केंद्रे यांची पत्नी नाटयकर्मी गौरी केंद्रे, मुलगा,ऋत्विक सगळ्यांचेच चेहरे फुलून आलेले होते. आलेल्या प्रत्येकाच्या हातावर पेढा ठेवला जात होता. केंद्रेच्या हातातला मोबाईल आणि टेबलावरचा लॅंडलाईन फोन सतत वाजत होता. आपल्या खुर्चीत बसून गुलाबी झब्बा घातलेले केंद्रे हसतमुखानं पण शांतपणे शुभेच्छांचा स्वीकार करत होते. शुभेच्छांचा वर्षाव झेलतच केंद्रेंनी माझ्याशी संवाद साधला.
यांची आठवण होते…
एनएसडीचे संचालक म्हणून निवड होण्याच्या क्षणी कोणाची आठवण होते असे विचारताच वामन केंद्रे भावूक झाले. सर्वप्रथम त्यांना आठवले ते वडील माधवराव केंद्रे. माधवराव यांची ओळख दरडवाडीच्या पंचक्रोशीत होती ती एक अस्सल भारूडकार म्हणून. या शेतकरी कलावंतानं वामन केंद्रे यांच्यातला कलावंत फुलवला. दोन-अडीच वर्षांपूर्वी माधवरावाचं निधन झालं. व्ही. एम. शहा, बी. व्ही.कारंथ, डॉ. पिल्ले या आपल्या गुरुंची आठवण केंद्रेंना मग आली. आदरानं त्यांनी उल्लेख केला तो पु. ल. देशपांडे आणि डॉ. अशोक रानडे यांचा.
त्यांच्यापासून खूप शिकायला मिळालं, कलेची जाण तर वाढलीच पण शिस्तही शिकायला मिळाली याचा केंद्रेंनी आवर्जून उल्लेख केला. नंतर निवड समितीचे आणि एनएसडीच्या संचालकपदी निवड होण्यासाठी मदत करणाऱ्या राजकारण्यांचेही ते आभार मानायला विसरले नाहीत. नाटकातले आपले सगळे सहकारी, कलावंत-लेखक, बॅकस्टेजवाले, समीक्षक-टीकाकार आणि मुख्य म्हणजे प्रेक्षक यांचा आवर्जून उल्लेख केंद्रेंनी केला. तसाच आदराने उल्लेख केला तो मुंबई विद्यापीठाचे माजी क