विकेन्ड डेस्टिनेशन : बदलापूरचं कोंडेश्वर

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात पावसाळ्यात निवांत क्षण शोधण्यासाठी पावलं वळतात मुंबईबाहेर... मुंबईच्या अवतीभवती अशी काही सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला हा मोकळा वेळ मिळेल...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 29, 2013, 11:09 AM IST


www.24taas.com,
चंद्रशेखर भुयार, बदलापूर

मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात पावसाळ्यात निवांत क्षण शोधण्यासाठी पावलं वळतात मुंबईबाहेर... मुंबईच्या अवतीभवती अशी काही सुंदर ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला हा मोकळा वेळ मिळेल... हिरवाईच्या देखाव्यात लपलेलं एक सुंदर ठिकाण म्हणजे बदलापूरजवळचं कोंडेश्वर... तुमचा वेळ तुम्ही इथं सत्कारणी नक्की लावू शकता.
निसर्गाचं वरदान...
सुंदर धबधबा.. भोवताली गर्द हिरवाई.. धबधब्याचा अवखळ ओहोळ... त्याच्यावर असलेला सुंदरचा बांध.. काठावर असलेलं महादेवाचं मंदिर... हे वर्णन आहे बदलापूरजवळच्या कोंडेश्वराचं. डोंगर कपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराईतून फेसाळत वाहणारे धबधबे, हिरवी वस्त्र परिधान केलेली भातशेतीची खाचरं.. रिमझीम पावसात धुक्याची दुलई पांघरलेले डोंगर असा वारसा मिरवणारा हा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. हेच ठिकाण पूर्वी ‘कुंडेश्वरर’ म्हणून ओळखलं जायचं.
जायचं कसं
- गाडी घेऊन येत असाल तर बदलापूर कर्जत रस्त्यावर खरवई गावात आल्यावर कोंडेश्वरकडे जाणारा मार्ग लागतो. तिथून भोज गावच्या दिशेनं कोंडेश्वरला पोहचता येतं.
- रेल्वेने येणारे पर्यटकांनी बदलापूर स्टेशनपासून दहिवली गावापर्यंत रिक्षा घेऊ शकतात. त्यापुढे चालत भोज मार्गे कोंडेश्वरला जाता येतं. सकाळच्या वेळी प्रत्येक तासाला दहिवली गावापर्यंत बसची सोय आहे. रेल्वे स्थानकापासून कोंडेश्वकर पाच किमीवर आहे, तर खरवई गावापासून ५ किमीवर आहे.

काय आहे इथं पाहण्यासारखं…
कोंडेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं प्राचीन शिवमंदिर, कोंडेश्वराचे दोन धबधबे म्हणजे त्याच्या शिरपेचातला मानाचा तुराच... इथे धबधब्याखाली धोकादायक निसर्गनिर्मित कुंडं होती. मात्र २६ जुलैच्या पावसात ही कुंडं रेती मातीमुळे भरली गेली.
आता पुन्हा एकदा हे धबधबे सुरक्षित झालेत. त्यामुळे आता पर्यटकांचा ओघही इथे वाढलाय. पावसाळ्यात मुंबईच्या इतक्या जवळ एवढा सुंदर निसर्ग मिळवून देणा-या कोंडेश्वरला भेट द्यायलाच हवी.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.