मुंबई : व्हिडीओ कॉलिंगचे फीचर लाँच केल्यानंतर आता व्हॉटसअॅप एक नव्या फीचरचे टेस्टिंग करत आहे. या नव्या फीचरनुसार जेव्हा एखाद्याने पाठवलेला व्हिडीओ तुम्ही डाऊनलोड करत असाल तर स्ट्रीम करताना तुम्ही तो पाहू शकता.
सध्या व्हॉटसअॅपवर जोपर्यंत समोरच्या व्यक्तीने पाठवलेला व्हिडीओ संपूर्ण डाऊनलोड होत नाही तोपर्यंत तुम्ही तो पाहू शकत नाही. मात्र या नव्या फीचरमुळे हा व्हिडीओ तुम्ही डाऊनलोड होत असतानाच पाहू शकता.
त्यामुळे जितका व्हि़डीओ डाऊनलोड झालाय तितका पाहू शकता. तसेच पाठवलेला व्हिडीओ न आवडल्याल तुम्ही डाऊनलोड कॅन्सलही करु शकता. यामुळे तुमचा डेटा अधिक वापरला जाणार नाही.
हे फीचर अँड्रॉईड फोन्सवर उपलब्ध आहे. एखादा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आल्यास अँड्रॉईडच्या बीटा अॅपमध्ये तुम्हाला प्लेचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनखाली व्हिडीओची साईज नमूद केली जाणार आहे. प्लेचा ऑप्शन निवडल्यानंतर व्हिडीओ स्ट्रीम होण्यास सुरू होईल.