मुंबई : व्हॉट्सअॅप वापरणा-यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या 30 जूननंतर विविध फोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. यामध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणा-या सहा फोनचा समावेश आहे.
विंडोज ७ फोन, ब्लॅकबेरी १०, नोकिया एस ६०, नोकिया एस ४०, अॅन्ड्रॉइड २.१ आणि अॅन्ड्रॉइड २.२ तसेच आयफोन ३जीएस आणि आयओएस ६ या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणा-या फोनसाठीचा व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद करण्यात येणार आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये अनेक नवे फीचर्स येणार आहे, भविष्यात येणारे नवे अपडेट जुन्या फोनवर चालणार नाहीत. हे जुने फोन नव्या अपडेटसाठी सक्षम नसल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
खूप आधी कंपनी या फोनमधून व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद करणार होती. मात्र, त्यानंतर कंपनीने ती वेळ वाढवली. त्यानंतर गेल्या वर्षी कंपनीने 30 जूननंतर व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता वेळ वाढवून न देता 30 जूननंतर व्हॉट्सअॅप या फोनचा सपोर्ट बंद करण्याची दाट शक्यता आहे.