www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतील एक शास्त्रज्ञ आणि त्यांच्या विद्यार्थिनीला अल्बर्ट आईनस्टाईनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून कृष्णविवरांचं रहस्य उलगडण्यात यश आलंय.
भारतीय विज्ञान संस्थेच्या भौतिकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक बानिब्रत मुखोपाध्याय आणि त्यांची विद्यार्थिनी इंद्राणी बॅनर्जी यांना हा ऐतिहासिक शोध लावण्यासाठी तब्बल दोन वर्षे कठोर परिश्रम करावे लागले. त्यांच्या कृष्णविवरांवरील अभ्यास आणि संशोधनाला हॉवर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांसह संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक समुदायानं मान्यता दिलेली आहे.
मुखोपाध्याय आणि बॅनर्जी यांनी आपले हे निष्कर्ष `फिजिकल रिव्हय़ू लेटर्स` या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत. तार्यांच्या मृत्यूनंतर जे काही उरते ते कृष्णविवर म्हणून ओळखले जाते. ते साध्या डोळ्यांनी मुळीच दिसत नाही. ही कृष्णविवरं दृश्यमान नसली तरी आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं ते आपल्या अवतीभोवती विद्यमान असलेले सर्व काही गिळंकृत करतात. वस्तुमान आणि गरागर फिरणे हा कृष्णविवरांचा स्थायी भाव आहे आणि ते आपल्या शेजारी असलेले सर्व काही आणि मृत तार्यारचे अवशेषही ओढून घेतात, असं आतापर्यंत मानलं जात आहे.
परंतु, २००७मध्ये भारतीय विज्ञान संस्थेत येण्याआधी तीन वर्षे हॉवर्ड विद्यापीठात काम करणारे बानिब्रत यांनी वस्तुमान आणि आवर्तन हे परस्परांवर अवलंबून नाहीत तर ते पूर्णत: स्वतंत्र आहेत. तार्या च्या वस्तुमानाचा उपयोग आवर्तनासाठी झालेला असू शकतो, असा नवा निष्कर्ष बानिब्रत यांनी काढला आहे.
`कृष्णविवरामधील आवर्तन हा अद्यापही चर्चेचा मुद्दा आहे. आवर्तनाचे परिमाण अद्यापही मोजता आलेले नाही. याउलट, वस्तुमान सहजपणे निर्धारित करता येऊ शकतं. कृष्णविवराचं आवर्तन हे प्रारंभीच्या तार्यााचं वस्तुमान आणि आवर्तन यावरून निश्चि त होतं. त्यामुळं वस्तुमान ज्ञात असेल तर आवर्तन हे पूर्वानुमानित असू शकतं,` असं बानिब्रत यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.