नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच 'ट्राय'ने फेसबूकला चांगलाच धक्का दिला आहे. फेसबूकच्या 'फ्री बेसिक्स'ला ट्रायने विरोध दर्शवला आहे. कोणत्याही टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाईडरला कोणत्याही किमान सर्व्हिसेससाठी फुकट अथवा कमी दराचे प्लान्स देता येणार नाहीत असा निर्णय ट्रायने दिला आहे.
१) कोणताही सर्व्हिस प्रोव्हाईडर काही किमान सेवांसाठी मोफत अथवा वेगळ्या दरात डेटा देऊ शकत नाही.
२) आपातकालीन सेवांच्या वापरासाठी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील आपातकालीन सेवांच्या वापरासाठी विशेष सूट देण्यास मंजुरी दिली आहे.
३) या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी आर्थिक परिणामही निश्चित करण्यात आले आहेत. यात नियमांचे उल्लंघन केल्यास प्रति दिवस ५०,००० रुपये इतका दंड ठरवण्यात आला आहे.
४) या सर्व बंधनांचा दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा विचार करण्यात येईल.
फेसबूकने आणलेल्या फ्री-बेसिक्स सर्व्हिसेसला अनेकांनी विरोध दर्शवला होता. यामुळे लोकांच्या इंटरनेट वापराच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असा आक्षेप काहींनी नोंदवला होता. यावरुन एका नवीन वादाला तोंड फुटलं होतं. अनेक आंदोलकांनी 'ट्राय'ला याचिका करुन आपला आक्षेप नोंदवला होता. यावर आज ट्रायने आपला निर्णय दिला आहे.