लखनौ : शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्सवर मैत्री करु नये, असा अजब फतवा उत्तरप्रदेशमधील शिक्षण विभागाने काढला आहे. सीबीएसई आणि अन्य शाळांमध्ये या फतव्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. या आदेशांचे पालन न करणा-या शाळांची परवानगी रद्द करु असं शिक्षण विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
सोशल मिडीयाद्वारे शोषण केल्याच्या घटना वाढत असल्याने उत्तरप्रदेशच्या शिक्षण विभागाने सोशल मिडीयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील फ्रेंडशिपवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाचे मुख्य सचिव जितेंद्र कुमार यांनी सर्व शाळांना एक परिपत्रक पाठवले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सोशल मिडीयावर संवाद साधू नये असे या पत्रात म्हटले आहे.
याशिवाय शाळेच्या मुख्य गेटजवळ, मैदान व जिन्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी सूचनाही या पत्रकात करण्यात आली आहे. या पत्रकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दाखले देण्यात आले असून सोशल मिडीयाद्वारे ब्लॅकमेल करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
शाळकरी विद्यार्थ्यांना सोशल मिडीयाच्या प्रभावापासून रोखता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करुन त्यांना सोशल मिडीयावर इंटरनेटचे फायदे व नुकसान समजवून सांगावाते असे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.