www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे विद्यापीठाचा "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ` असा नामविस्तार करण्याचा ठराव सिनेटने मंजूर केला. या ठरावास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेऊन तो राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. यामुळे गेल्या दोन वर्षापासून होत असलेल्या नामकरणाच्या मागणीने मान्यतेचा एक टप्पा ओलांडला आहे.
अधिसभा सदस्य प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ यांनी नामकरणाच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा संदर्भ देत त्यांनी नामकरणाची मागणी केली. "नामांतर कृती समितीने त्यासाठी खूप प्रयत्न केले. विधानसभेतही मागणी करण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी विद्यापीठाकडून तसा ठराव आला, तर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते,` असे बाळसराफ यांनी सांगितले. त्यानंतर सिनेटमध्ये प्रस्तावावर चर्चा होऊन एकमत झाले.
डॉ. गजानन एकबोटे यांनी, विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देताना त्याबरोबर पुणे विद्यापीठ हा शब्द कायम ठेवावा, अशी उपसूचना मांडली. डॉ. एकबोटे म्हणाले, ""पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव द्यावे; पण विद्यापीठाची जगभरात पुणे विद्यापीठ अशी ख्याती आहे. हे नाव "ब्रॅंड` झाले आहे. त्यामुळे "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ` असे नामकरण करावे.`` त्यांची उपसूचनाही अन्य सदस्यांनी मान्य केली. या ठरावास व्यवस्थापन समितीची मान्यता घेऊन तो राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.