आपल्या मुलांना 'पॉर्न'पासून दूर ठेवणं आता होणार सोप्पं!

पॉर्न साईटवर वचक ठेवण्यासाठी काही टेलिकॉम कंपन्या सरसावल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयामुळे, पालकांना आपल्या मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवर नजर ठेवणं आणि त्यांना नियंत्रित करणं शक्य होणार आहे.  

Updated: Jan 19, 2016, 04:26 PM IST
आपल्या मुलांना 'पॉर्न'पासून दूर ठेवणं आता होणार सोप्पं! title=

नवी दिल्ली : पॉर्न साईटवर वचक ठेवण्यासाठी काही टेलिकॉम कंपन्या सरसावल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयामुळे, पालकांना आपल्या मुलांच्या इंटरनेट सर्फिंगवर नजर ठेवणं आणि त्यांना नियंत्रित करणं शक्य होणार आहे.  

भारती एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स कम्युनिकेशन, टेलिनॉर आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम यांसारख्या बड्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना एक 'सेन्सॉरशीप टूल' उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात मोदी सरकारनं जवळपास ९०० पॉर्न वेबसाईटवर बंदी आणल्यानंतर टेलिकॉम कंपन्या या पर्यायावर विचार करत होत्या. पण, सरकारचा या निर्णयावर सोशल मीडियावर बराच वाद झाल्यानंतर कंपन्यांनी या निर्णयावर एक पाऊल मागे घेतलं होतं. 

परंतु, आता मात्र कंपन्यांनी 'जबाबदार' पद्धतीनं वागण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी, आपण सरकारच्या निर्णयाचा आदर करतोच मात्र आपण व्यक्तिगत स्वातंत्र्याचाही आदर करत असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. 

त्याचमुळे, ग्राहकांना जे हवंय ते उपलब्ध करून देतानाच त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची तयारीही कंपन्यांनी दर्शवली आहे. यासाठी एक वेगळा प्लानही या कंपन्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. फेब्रुवारी-मार्चपर्यंत ही सेवा सुरू होऊ शकेल.