बँक खात्यातून ऑनलाईन लूटीचे प्रकार वाढले

(अखिलेश हळवे, झी मीडिया) नागपूर शहराची गुन्हेगारीची चर्चा विविध कारणांनी सातत्याने होत आहे. शहरातील मागील ५ वर्षाच्या काळात सायबर संबंधी गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

Updated: Oct 19, 2015, 04:47 PM IST
बँक खात्यातून ऑनलाईन लूटीचे प्रकार वाढले title=

नागपूर : (अखिलेश हळवे, झी मीडिया) नागपूर शहराची गुन्हेगारीची चर्चा विविध कारणांनी सातत्याने होत आहे. शहरातील मागील ५ वर्षाच्या काळात सायबर संबंधी गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

यात लुटलेली रक्कमेच प्रमाणही वाढलंय, फक्त नागपुरच नाही, तर राज्यात देखील गुन्हेगारीच्या या नव्या स्वरूपात वाढ झाली आहे. त्यामुळे आता पारंपरिक लुटण्याच्या आणि चोरीच्या प्रकारात गुन्हेगारांनी सायबर गुन्ह्यांची भर टाकल्याने पोलिसांचे काम वाढले आहे. 

रोज नित्य-नवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने, देश सातत्याने विकासाचा टप्पा गाठतो आहे. पण दुर्दैवाने याला दुसरी बाजू देखील आहे. ती म्हणजे वाढती सायबर गुन्हेगारी. गेल्या ५ वर्षाच्या नागपुरातील आकडेवारीचा विचार केला तर या काळात सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

२०१० मध्ये नागपुरात फक्त ५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती आणि यातून लुबाडलेली रक्कम २६ लाख ४७ हजार ९१५ होती. यात प्रचंड वाढ होत या वर्षी जुलैपर्यंत एकूण ५८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात १,६७,०९,०९९ रुपये इतकी रक्कम लुटली आहे. 

२०१० ते २०१५ या ५ वर्षांचा विचार केला तर या दोन्ही आकड्यांमध्ये ही वाढ मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आहे. मागील वर्षी एकूण ६५ गुन्ह्यांची नोंद झाली आणि यातून लुटलेली रक्कम २ कोटी १८ लाख ८८ हजार १६७ इतकी होती. 

वाढती सायबर गुन्हेगारी हि फक्त शहरात मर्यादित नसून संपूर्ण राज्यात याचा प्रकोप जाणवत असल्याने आता पोलिस विभाग राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे आयोजित करणार आहे. यात शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, पोलिस अधिकारी उपस्थित असतील आणि या माध्यमाने विद्यार्थ्यांना सतर्क केले जाणार आहे. 

इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असून शहर किवा ग्रामीण - आता कुठलेही क्षेत्र यापासून अलिप्त राहिले नसल्याचे, राज्याचे पोलिस महासंचालक प्रविंद दीक्षित यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व बाबतीत सतर्कता कशी बाळगता येईल आणि खरे आणि खोट्यामधील फरक कसा ओळखायचा, हे देखील या मेळाव्यांच्या माध्यमाने सांगितले जाणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. 

ऑन-लाइनच्या वाढत्या फ्रॉडमुळे येणाऱ्या काळात पोलिस विभाग समोर एक मोठी समस्या होणार यात कुठलीच शंका नाही. त्यामुळे एकीकडे शाळांमध्ये मेळावे घेताना, पोलिस विभागाने देखील आपल्या कर्मचार्यांना या बाबतीत सतर्क करणे तितकेच गरजेचे आहे. 

वर्ष, गुन्ह्यांची संख्या, लुटलेली रक्कम 
१. 2010 - 5 - Rs 26,47,915
२. 2011 - 11 - Rs 10,950
३. 2012- 26 - Rs 27,61,550
४. 2013 - 23 - Rs 35,95,292
५. 2014 - 65 - Rs 2,18,88,167
६. 2015 - 58 - Rs 1,67,9,099 (जानेवारी ते जुलै) 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.