अंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’चं महत्त्वाचं टेस्टिंग आज

येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानानं लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.

Updated: Sep 22, 2014, 11:59 AM IST
अंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’चं महत्त्वाचं टेस्टिंग आज title=

नवी दिल्ली: येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानानं लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.

४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) इंजिन गेल्या ३०० दिवसांपासून सुप्तावस्थेत आहे. त्याची किमान ४ सेकंदासाठी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी ठरली, तर मंगळ यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या यशस्वीतेबाबतचा इस्रोचा आत्मविश्वास अधिक वाढेल.

‘आम्ही चौथ्या पथ संशोधन कार्य आणि प्रमुख द्रवित इंजिनच्या प्रायोगिक चाचणीसाठी तयार आहोत. त्यासाठी अंतराळ यानाला कमांड देण्यात आले आहेत आणि त्याची तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे,’ असं इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण ३०० दिवसांपर्यंत निष्क्रिय पडून असलेल्या इंजिनला चाचणीसाठी पुन्हा सुरू केलं जाणार आहे. एलएएम इंजिनची प्रायोगिक चाचणी ही एक परीक्षाच आहे. मंगळाची कक्षा भेदण्याच्या उद्देशाने या इंजिनला दीर्घकाळासाठी सक्रिय करावयाचं आहे, असं हा अधिकारी म्हणाला.

या इंजिनची प्रायोगिक चाचणी ३.९६८ सेकंदांसाठी २.१४२ मीटर प्रति सेकंद वेगानं घेतली जाईल. त्यासाठी किमान ०.५६७ किलो इंधन खर्च होईल. मंगळ मिशन हे भारताचं पहिलंच आंतरग्रह मिशन आहे. हे मंगळ यान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकलच्या (पीएसएलव्ही) मदतीनं प्रक्षेपित करण्यात आलं होतं. हे मंगळ यान बुधवारी लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ६६ कोटी ६० लाख कि.मी.च्या आपल्या प्रवासादरम्यान हे मंगळ अंतराळ यान १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या बाहेर पडलं होतं.

दरम्यान, सोमवारची योजना अपयशी ठरली, तर आपली दुसरी योजना (बी प्लान) तयार आहे. याअंतर्गत आठ प्रक्षेपकांना दीर्घकाळासाठी सोडलं जाईल. त्यासाठी जादा इंधन लागेल आणि यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करू शकेल, असं इस्रोनं म्हटलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.