मुंबई : आपल्या नोकरीत आपला पगार वाढावा आणि आपली वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण, ही वाढ सहजासहजी होत नाही. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी या काही खास टिप्स...
तुमचा गृहपाठ नीट करा
तुमच्या अप्रेजल इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही गेल्या वर्षात केलेल्या कामाचा नीट अभ्यास करा. तुम्ही गेल्या वर्षात कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या त्याची सर्वात आधी माहिती द्या. येणाऱ्या काळात तुमचा अॅक्शन प्लान काय आहे त्याचीही माहिती द्या. तुम्हाला काय सांगायचे आहे, याची तुम्हाला माहिती असेल तर त्याचा ताण तुमच्यावर येणार नाही.
त्रुटींवर लक्ष द्या
अप्रेजल इंटरव्ह्यूमध्ये तुमची पडताळणी केली जाते. ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामात सुधारणा करू शकता, अशी तुम्हाला आशा आहे, अशा त्रुटीच्या जागांविषयी आपल्या मुलाखतीत नक्की बोला. तुमच्या वरिष्ठांना त्याविषयी काय वाटतं याची जाणीव करुन घ्या.
प्रामाणिक राहा
अनेक वेळेस आपल्या डेडलाईनमध्ये आपले काम पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही तुमचे उद्दिष्ट गाठू शकत नाही. या तुमच्या चुका प्रामाणिकणे मान्य करा. तुमच्या चुकांमधून तुम्ही काय शिकलात याची तुमच्या वरिष्ठांना जाणीव करुन द्या. उगाच स्वतःचा बचाव करण्यापेक्षा तुमचा प्रामाणिकपणा दिसू द्या.
कंपनीचं कल्चर समजून घ्या
तुमची कंपनी कशाप्रकारे काम करते याची तुम्हाला कल्पना असणे आवश्यक आहे. आपले उद्दिष्ट आणि कंपनीचे उद्दिष्ट याची आपण सांगड घालतोय का? याची वारंवार पडताळणी करा. तुम्ही तुमच्या कंपनीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कशाप्रकारे मदत करत आहात, याची वरिष्ठांना कल्पना द्या.
आपला आवाज बुलंद करा
तुमच्या कामाच्या ठिकाणी जर कोणत्या अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर तुमच्या इंटरव्ह्यू दरम्यान त्याविषयी आवाज उठवा. तुम्हाला सतावत असलेल्या अडचणींविषयी स्पष्टपणे बोला. तुमच्याकडे काही उपाययोजना असल्यास त्या सुचवा. यामुळे कंपनीची मॅनेजमेंट तुमच्यावर प्रभावित होऊ शकते आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.