मुंबई : तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर लवकरच निर्बंध येण्याची शक्यता आहे.. केंद्र सरकार अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं ही माहिती दिलीय.
देशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्राय ही संस्था आहे. त्याच धर्तीवर सोशल मीडिया सेवा देणा-या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा असावी अशी सरकारची भूमिका आहे. फेसबुक, व्हॉट्स ऍप, स्काईप, जी-टॉकसारख्या सेवांचा यांत समावेश आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणा-या संवादावर आणि त्याच्या डेटाचा उपयोग या कंपन्या व्यावसायिक वापरासाठी करत होत्या. त्यावर निर्बंध घालण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं सरकारचं मत मागवलं होतं.
या कंपन्यांच्या सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे संकेत सरकारनं कोर्टाला दिलंय. हे निर्बंध कशाप्रकारचे असतील हे स्पष्ट नसलं तरी याबाबतची पुढील सुनावणी 18 एप्रिलला होईल.