आधारकार्ड संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी

तुम्हाला आता नवीन मोबाईल कनेक्शन म्हणजेच सिम कार्ड घ्यायचं असेल तर ‘आधार कार्ड’ आवश्यक होणार आहे. 

Updated: Feb 24, 2016, 10:21 PM IST
आधारकार्ड संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी title=

नवी दिल्ली : तुम्हाला आता नवीन मोबाईल कनेक्शन म्हणजेच सिम कार्ड घ्यायचं असेल तर ‘आधार कार्ड’ आवश्यक होणार आहे. 

आधार क्रमांकाशिवाय तुम्हाला मोबाईल कनेक्शन मिळणार नाही. भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरण म्हणजेच ट्रायने याबाबतची शिफारस केंद्र सरकारकडे विचारार्थ पाठवली आहे. केंद्र सरकारने ट्रायची शिफारस स्वीकारली तर आधार क्रमांकाशिवाय देशात कुणालाच नवीन मोबाईल कनेक्शन मिळणार नाही.

‘ट्राय’ने पंधरा दिवसांपूर्वीच सरकारकडे आधारबाबतची शिफारस पाठवल्याचं ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी बार्सिलोनामध्ये भरलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सांगितलं. बार्सिलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेस हे जगभरातील गॅझेट प्रेमींसाठी एक जागतिक इव्हेंट असतो. या मोबाईल काँग्रेसमध्ये दररोज नवनवे फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि गॅझेट्स लाँच होतात.

नवीन सिम कार्ड घेण्यासाठी सध्या आवश्यक असलेल्या पत्त्याच्या आणि व्यक्तिगत ओळखीच्या पुराव्यात सध्या अनेकजण आधार कार्ड किंवा क्रमांक देतातही. यापुढे मात्र ते अनिवार्य होण्याची शक्यता आहे. तसंच आधार क्रमांकाशी तुमचा सिम नंबर जोडला जाणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपातील केवायसी आता नव्या मोबाईल कनेक्शनसाठी अनिवार्य ठरणार आहे.

नवीन मोबाईल कनेक्शन घेताना एखाद्या ग्राहकाने फक्त त्याचा आधार क्रमांक सांगितला तर त्याचं व्हेरिफेकिशन तातडीने होऊ शकेल. एकदा त्या ग्राहकाची खरेपणाची ओळख पटली की त्याला अन्य काही कागदपत्रे देण्याची आवश्यकता पडणार नाही. नव्या ग्राहकाची सर्व प्रकारची व्हेरीफिकेशन्स ऑनलाईन म्हणजेच पेपरलेस होतील.

अलीकडेच सेबीनेही म्युच्युअल फंड ग्राहकांसाठी केवायसी दस्तावेज म्हणून आधार कार्डाला मान्यता दिलीय.