दहावीच्या परीक्षेआधीच उत्तीर्ण झालीय ४५ वर्षीय सरीता!

शिकायची खरोखर इच्छा असेल, तर कोणतंच बंधन आड येत नाही... वयाचंही नाही... मुंबईतल्या एका गृहिणीनं हेच सिद्ध केलंय.

Updated: Mar 4, 2016, 05:01 PM IST
दहावीच्या परीक्षेआधीच उत्तीर्ण झालीय ४५ वर्षीय सरीता! title=

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : शिकायची खरोखर इच्छा असेल, तर कोणतंच बंधन आड येत नाही... वयाचंही नाही... मुंबईतल्या एका गृहिणीनं हेच सिद्ध केलंय.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या आपल्या मुलीचा सरिता झगडे अभ्यास घेतच नाहीत... तर त्यादेखील अभ्यास करतायत. वयाच्या ४५ व्या वर्षी त्या दहावीची परीक्षा देता आहेत... खरी गम्मत झाली ती पेपर द्यायला त्या एक्झाम हॉलमध्ये गेल्या तेव्हा... मुलांना वाटलं बाईच आल्या... पण त्यादेखील बेंचवर पेपर द्यायला बसल्या तेव्हा सगळेच अचंबित झाले.

सरितांचं बालपण हालाखीत गेलं... त्या चौथीमध्ये असताना त्यांचे वडील गेले आणि शिक्षण सोडावं लागलं. शिवडीमध्ये राहणाऱ्या विश्वनाथ झगडेंशी विवाह झाला आणि संसाराच्या रगाड्यात शिकायचं राहूनच गेलं. त्यांना दोन मुली आहेत. मोठ्या क्षितिजानं बारावीची परीक्षा दिलीय आणि धाकटी श्रुतिका दहावीत आहे. सकाळी तिघी जणी घरातली कामं आटोपतात आणि एकत्र अभ्यासाला बसतात... गणित आणि विज्ञान या सरितांना जड जाणाऱ्या विषयांमध्ये त्या मदतही करतात. आपल्या आईनं SSC करून थांबू नये, ग्रॅज्युएट व्हावं, असं दोघींनी वाटतंय.

पती विश्वनाथ यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरितांमागे लकडा लावला. त्यांना रात्रशाळेमध्ये प्रवेश घ्यायला लावला... अभ्यासात मदत केली... स्वतः विश्वनाथ यांनी २००९ साली ४३ व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय... नोकरीसाठी नव्हे, तर शिक्षणाला तरणोपाय नाही, म्हणून सरितांनी शिकावं असं त्यांना वाटतंय.

आता सरितांकडे बघून या भागातल्या अन्य अशिक्षित महिलांनाही शिकावंसं वाटू लागलंय... आता, सगळा संसार झाल्यावर शिकून काय मिळणार? हा विचार मागे पडतोय... त्यामुळे निकाल काहीही लागला तरी सरिता झगडे शत-प्रतिशत उत्तीर्ण झाल्यात, हे नक्की...