www.24taas.com, नवी दिल्ली
एकाच वेळी अनेक घरसंसार आणि व्यावसायाच्या कामात तारेवरची कसरत करणाऱ्या अनेक स्त्रिया तुम्ही आजुबाजुला पाहिल्या असतील. पण, हीच बाब आता भारतीय स्त्रियांचं विशेषत्व ठरलीय.
देशातील जास्तीत जास्त महिलांना स्वत:ला कुटुंब आणि कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्वत:ला लवचिक ठेवणं जास्त भावतं. व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात योग्य संतुलन ठेवणं म्हणजेच ‘सफलता’ त्या मानतात.
व्यावसायिकांची नेटवर्किंग साईट ‘लिंक्डइन’नं केलेल्या एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आलीय. सर्व्हेमध्ये ९४ टक्के महिलांच्या मते त्यांनी स्वत: यशस्वी व्यावसायिकाची भूमिका पार पाडलीय.
या सर्व्हेक्षणानुसार, जगभरातील जास्तीत जास्त महिला (६३ टक्के) काम आणि व्यक्तीगत जीवनातील ताळमेळीलाच त्यांच्या ‘सफलते’ची व्याख्या मानतात. सोबतच जवळजवळ एक तृतीअंश (७४ टक्के) महिलांच्या मते, त्यांना दोन्ही आघाड्यांवर यश मिळू शकतं, असा ठाम विश्वास आहे.
निष्कर्षांनुसार, सहा वर्षांपेक्षा अधिक काळाचा अनुभव असणाऱ्या भारतीय महिला कमी अनुभव असणाऱ्या महिलांपेक्षा आपल्या व्यावसायिक जीवनात अधिक संतुष्ट आहेत.