www.24taas.com, लंडन
लहानपणी मुलांच्या श्रीमुखात भडकावल्यास किंवा त्यांच्यावर ओरडल्यास त्या मुलांना भविष्यात कँसर किंवा हृदरोग होण्याचा धोका वाढतो. एका नव्या संशोधनातून असं स्पष्ट केलं गेलं आहे की लहान मुलांवर ओरडल्यास त्यांच्यावरील ताण वाढतो आणि त्यांना जीवघेणे आजार जडू शकतात.
टेलीग्राफ या वर्तमानपत्रामध्ये यासंदर्भात दिल्या गेलेल्या माहितीत लहान मुलांच्या मानसिकतेचा त्यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा ऊहापोह करण्यात आला आहे. लहान मुलं सतत तणावाखाली राहात असतील, तर त्यांच्यात जे जैविक परिवर्तन होतं, त्यातून मुलांना हृदरोग, अस्थमा किंवा कँसरसारखे आजार होऊ शकतात.
प्लायमाऊथ विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी सौदी अरेबियातील २५० निरोगी प्रौढांना त्यांच्या बालपणाविषयी विचारलं. त्यांच्या उत्तरांमधून काही निष्कर्ष काढले गेले. त्यानंतर त्यांची तुलना १५० हृद्विकारी प्रौढांसोबत, १५० कँसरग्रस्त प्रौढांशी तर १५० दम्याच्या रुग्णांशी केली. आजार असलेल्या प्रौढांना त्यांच्या बालपणाविषयी विचारलं गेलं. त्यांनी पालकांचा खाल्लेला मार, त्यांच्यावर लहानपणी असलेला दबाव या गोष्टींचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आला, की लहानपणी तणावाखाली बालपण गेल्यास त्याचा परिणाम मोठेपणी प्राणघातक आजारांमध्ये होऊ शकतो.