छत्तीसगडमध्येही भाजपची विजयाची हॅट्ट्रीक!

अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 9, 2013, 08:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायपूर
अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.
मात्र या निवडणुकीत भाजपला धक्का दिला तो बस्तरनं. २००८ मध्ये १२ पैकी ११ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं. तर गेल्या वेळी केवळ १ जागा जिंकलेल्या काँग्रेसला तब्बल आठ जागा मिळाल्या. मात्र मुख्यमंत्री रमण सिंह यांनी ही कसर दुसऱ्या टप्प्यातल्या जागांमध्ये काढली आणि भाजपनं सत्तेची हॅटट्रीक केली.
रमण सिंह यांना पुन्हा एकदा त्यांच्या स्वस्त अन्नधान्याच्या योजनेनं तारलेलं दिसतंय. आरोग्य क्षेत्रात त्यांनी राबवलेली संजीवनी योजनाही जनतेत लोकप्रिय झाली. धानासाठी २१०० रुपयांचा हमीभाव आणि शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाची घोषणाही भाजपसाठी फलदायी ठरल्याची दिसतेय.

दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसला छत्तीसगडकडून अपेक्षा होत्या. मात्र रमण सिंह यांनी काँग्रेसचं हे स्वप्न उध्वस्त केलंय. काँग्रेसला या निवडणुकीत नेतृत्वाबाबतचा संभ्रम भोवलाय. अजित जोगी यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा असूनही त्यांच्याकडे अधिकृत नेतृत्व सोपवण्यात आलं नव्हतं. काँग्रेस नेत्यांवरील नक्षली हल्ल्यांची सहानुभूती काँग्रेसला मिळाली खरी मात्र ती बस्तर पुरताच मर्यादित राहिली.
यावेळी छत्तीसगडमध्ये विक्रमी मतदान झालं. या वाढलेल्या मतदानानं छत्तीगडच्या सत्तेची समीकरणं ठरवली. बस्तरमध्ये वाढलेलं मतदान म्हणजे काँग्रेसप्रति सहानुभुतीची लहर होती तर इतर ठिकाणी विकासाचा असर होता असंच म्हणावं लागेल....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.