www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली
दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणाऱ्या काँग्रेचा सफाया केलाय. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव अरविंद केजरीवाल करणार हे निश्चित झाले आहे. केजरीवाल यांनी ५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या 'आप' जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र असून सध्याच्या निकालांनुसार या पक्षाने २१ जागांवर आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आपला केवळ ११ ते १६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत आपने चांगलीच मुसंडी मारली.
७० जागांसाठीची मतमोजणी सुरु असून दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि आम आदमीमध्ये चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपने बहुमताकडे वाटचाल केल्याने भाजपला आता कोणाची मदत घेण्याची गरज नाही. दिल्लीत सुरूवातीला त्रिशंकु परिस्थिती असल्याचे चित्र दिसून येत होते.
भाजप पहिल्या तर केजरीवाल यांचा आप दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, सत्तेत असलेल्या काँग्रेसला जोराचा झटका बसला आहे. काँग्रेस सध्यातरी तिसऱ्या स्थानकावर गेला आहे.
केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून दिल्ली विधानसभा निवडणूकीसंदर्भात मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून या निकालांनंतरच्या त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे. मात्र, आपने कोणाबरोबर जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आप विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.