www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
राज्याच्य़ा विधीमंडळात जादूटोणाविरोधी विधेयक संमत होत असताना वसईजवळ मात्र नरबळीचा प्रकार घडत होता. सतत आजारी असणाऱ्या पत्नीसाठी आणि कुटुंबातलं भांडण मिटवण्यासाठी ५५ वर्षीय महिलेचा नरबळी देण्यात आला. १७ नोव्हेंबरला कलावती गुप्ता या महिलेचा मुंडकं नसलेला मृतदेह वाळीव पोलिसांना मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापडला होता. त्या हत्येच्या तपासात ही धक्कादायक बाब उघड झालीय.
पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा नरबळीचा प्रकार उघड झालाय. वसईजवळ वाळीव गावात हा प्रकाऱ घ़डलाय. कलावती गुप्ता ही महिला मुंबईत राहणा-या सर्वजीत कहार या मांत्रिकाकडे जात होती. कलावतीचा मुलगा वारंवार आजारी पडत होता. त्यावर उपाय म्हणून ती मांत्रिकाकडे जात होती. दुसरीकडे रामधनी यादव याची पत्नी वारंवार आजारी पडत होती. यावर उपाय म्हणून तोही या मांत्रिकाकडे जात होता. यावर कहार याने त्याला नरबळी देण्याचा उपाय सुचवला. म्हणूनच रामधनी यादव आणि त्याच्या भावाने या कलावतीचा बळी दिला.
रात्रीच्या वेळी रामधनी, त्याचा भाऊ गुलाब, मांत्रिक सर्वजीत, आणि त्याचा मुलगा सत्यनारायण कलावतीला घेऊन नालासोपारा हायवेजवळ एका नाल्याजवळ पुजा करण्यासाठी घेऊन गेले. तिथेच त्यांनी कलावतीची हत्या केली. एकीकडे विधेयक संमत झालाय. कायदाही बनेल, दोषींना शिक्षाही होतील पण समाजातली ही अंधश्रद्धेची कीड नष्ट होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.