www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीतल्या समुद्रात भरकटलेल्या जहाजाचं अखेर गुढ उकललंय. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हे जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरच्या समुद्रात विसावलंय. रविवारी हे जहाज समुद्रात दिसल्या नंतर अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र आता या जहाजात संशयास्पद असं काहीच नसल्याचं स्पष्ट झालंय.
मुंबईत बांधणी केल्यानंतर हे जहाज कोलकात्याला जात होतं. त्यावेळी रत्नागिरी समुद्रात इंजिनमध्ये बिघाड झाला आणि हे जहाज भरकटलं. मात्र आज स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांनी या जहाजावरील १० खलाशांना सुखरूप बाहेर काढलं. रत्नागिरी पोलीस आणि येथील जिगरबाज स्थानिक तरुणांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अडीच तासांचे विशेष ऑपरेशन हाती घेऊन त्या दहा जणांची सुटका केली. मात्र या प्रकारामुळे संपूर्ण किना-यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या सागरी सुरक्षेच्या यंत्रणा कुचकामीच असल्याचा प्रत्यय आला.
मुंबई येथील सोहम शिपिंग कॉर्पोरेशन येथे तयार झालेले ‘श्री जॉय’ हे मालवाहू जहाज घोडबंदर येथून कोलकात्याला निघाले होते. मात्र रत्नागिरीच्या किनारपट्टीवर भगवती बंदर येथे ‘श्री जॉय’च्या इंजिनमध्ये बिघाड झाला. ते शनिवारपासून भगवती बंदर येथे किनारपट्टीपासून तीन कि. मी. अंतरावर उभे होते. रविवारी पहाटे समुद्रातील लाटा आणि भरतीच्या पाण्याने हे बार्ज मिऱ्या-अलावा येथील किनारपट्टीजवळ भरकटले.
काही तासांच्या प्रयत्नांनंतर मिऱ्या समुद्राच्या किनाऱ्याच्या अगदी जवळ आलेल्या या बार्जला पुन्हा समुद्रात नेण्यात बार्जमधील कॅप्टन व खलाशांना यश आले. मात्र समुद्रातील उंच उंच लाटा आणि धो-धो कोसळणारा पाऊस, निसर्गाच्या या रौद्ररूपासमोर वाचणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर बार्जवरील प्रत्येकाने स्वत:च्या परीने वाचण्याकरता प्रयत्न सुरू केले. जहाजावरील कॅप्टनने मुंबई कोस्टगार्डकडे मदतीची मागणी केली.
मुंबई कोस्टगार्डने रत्नागिरी पोलिसांना खबर दिली आणि रविवारी रात्री आठ वाजता सर्व यंत्रणा जागी झाली. त्यानंतर धावाधाव झाली. या बार्जवरील कॅप्टन विजय पंजाबी (रा. मुंबई), विनोदकुमार (रा. पंजाब), चीफ इंजिनीअर बिपिनचंद्र थर (रा. उत्तराखंड), खलाशी मदनकुमार (चेन्नई), रमाकांत पाटील (पेण), राजेश गंगाधरन (रा. मुंबई), सॅम थॉमस पाणीकर (रा. केरळ), ज्ञानू अशोक सिंह (रा. घाटकोपर), हसमत शेख, चंद्री हलदार (रा. पश्चिम बंगाल) यांना बार्जवरून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. बार्जवरील दहा जणांची चौकशी शहर पोलिसांनी केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.