www.24taas.com,सिंधुदुर्ग
हापूसच्या अवीट गोडीनं कोकणचे नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचलंय. या हापूसच्या जोडीला आता कोकणच्या याच पट्ट्यात पहिला साखर कारखाना मंजूर झालाय. साहजिकच कोकणच्या अर्थकारणाला अधिक मजबुती मिळण्याची शक्यता आहे.
कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कोकणचा हापूस आंबा. या हापूस आंब्याबरोबरच कोकणची काळी मैनाही कोकणचं वेगळेपण टिकवून आहे. आता या सर्वांच्या जोडीला येणारेए कोकणातील साखर. मात्र साखर कारखाने म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पश्चिम महाराष्ट्र.
मात्र आता कोकणातही साखर कारखाना मंजूर झाल्यानं कोकणच्या अर्थकारणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जातंय. विशेष म्हणजे हा कारखाना मंजूर करण्यासाठी काँग्रेसच्या विजय सावंत यांना स्वपक्षियांचाच सामना करावा लागला.
कोकण विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो... या राणेंच्या बालेकिल्ल्यातच राणेंचे विरोधक असणा-या विजय सावंतांनी साखर कारखाना मंजूर करुन आणलाय.. आणि आता तर कारखान्याच्या भूमिपूजनासाठी सोनिया गांधींनाच निमंत्रित करणारेत.
पाच हजार गाळप क्षमता असलेला हा कारखाना दोन वर्षात कणकवली तालुक्यातल्या शिडवणेत उभा राहणार आहे. मात्र त्यासाठी गरज आहे ती राजकारण्यांनी एकत्र येण्याची.