www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडमधील पुराचा फटका महाराष्ट्रातील भाविकांनाही बसला आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण १०२ पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुलाब दोशी (५७) असं या महिलेचं नाव आहे. गुलाब दोशी यांचा रविवारी थंडीमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुळच्या महाडमध्ये राहणाऱ्या गुलाब दोशींचा बद्रिनाथमध्ये मृत्यू झालाय.
ढग फुटल्यागत पाऊस झाल्याने उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पुराची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हरियाणमध्ये यमुनेच्या पाण्यात वाढ झाल्यानं इथं काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीनं चिंतेत वाढ झालीय. पुरामुळे अनेक जणांचे बळी गेलेत तर शेकडो जण पुराच्या पाण्यात अडकून पडलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.