www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर ठाण्यातलं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. राजकारण्यांच्या एकमेकांना शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात पोलिसांची मात्र चांगलीच गोची झालीय.
गेल्या १२ दिवसांपासून बेपत्ता असलेले मिलिंद पाटणकर घरी परतल्यानंतर ठाण्यातलं राजकारण आता चांगलंच तापलंय. उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या वादग्रस्त प्रकरणानंतर युतीमधल्या भाजपचे मुकेश मोकाशी हे उपमहापौरपदी विराजमान झाले. या विजयानंतर युतीमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी आघाडी मात्र बिथरलीय. याच अनुषंगानं आघाडीनं उपमहापौर पाटणकर यांच्या कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी मुकेश मोकाशी यांना स्थानिक पोलिसांनी अटक का केली नाही? असा सवाल उपस्थित केला. याच मागणीच्या विरोधात युतीचे कार्यकर्ते नौपाडा पोलीस स्टेशनजवळ जमले होते. त्यांनी मोकाशी यांच्या अटकेला विरोध केला.
‘उपमहापौरपद आघाडीच्या हातून गेल्यानं आघाडी अशी राजकीय खेळी करत असून आम्ही हे खपवून घेणार नाही’, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिलाय. या सर्व प्रकाराने ठाण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नौपाडा पोलिसांची चांगलीच तारांबळ उडालीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.