www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
कांदाची आवक घटली आहे मात्र, मागणीत वाढ झाल्याने कांद्याच्या भावाने आणखी उचल खाल्ली आहे. कांद्याचा दर थेट ५० रूपयांवर पोहोचला आहे. कांद्याची दोन महिने टंचाई जाणवण्याची शक्यता असून कांद्याचा दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
घाऊक बाजारात कांदा ३५ रूपये दराने विक्री करण्यात येत आहे. किरकोळ बाजारामध्ये कांदा ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. पुढील काही दिवसांत भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळामुळे राज्यभर कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी होवू लागली आहे.
कांद्याचा साठा संपू लागला आहे. यामुळे मागील एक महिन्यापासून बाजारभाव वाढू लागले आहेत. सर्वाधिक कांदा उत्पादन होणार्या नाशिकमधील लासनगाव घाऊक बाजारामध्ये कांदा ३० ते ३५ रूपये दराने विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईसह इतर सर्वच शहरांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात हलका कांदा ४० रूपये तर चांगला कांदा ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक त्रस्त झाला आहे. कांद्याचा वापर कमी होवू लागला आहे. हॉटेलमधील जेवणासोबत दिल्या जाणाऱ्या कांद्याचे प्रमाणही कमी झाले आहे.
दरम्यान, पुण्यात कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे. मार्केट यार्डातील तीन वर्षांतील उच्चांकी म्हणजेच दहा किलोसाठी ४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तीन वर्षांपूर्वी प्रति दहा किलो ७०० रुपये भाव मिळाला होता. मार्केट यार्डात गेल्या आठवडाभर नियमितपणे ७० ते ८० ट्रक कांद्याची आवक होत होती. यात आता घट होऊन ती ३० पर्यंत खाली गेली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.