www.24taas.com , माथेरान
माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर... नेरळ - माथेरान टॉय ट्रेनला आता विशेष डबा जोडण्यात आलाय. या विशेष डब्यात पर्यटकांसाठी खास सुविधाही देण्यात आल्यात. सहा जणांचं कुटुंब किंवा पर्यटकांच्या ग्रुपला या विशेष डब्यातून सफर करायला मिळणार आहे.
माथेरानला जाताना टॉय ट्रेननं प्रवास करणं ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच... ही टॉय ट्रेन माथेरानची राणी म्हणून ओळखली जाते. नेरळ-माथेरान मिनीट्रेनचं सौदर्यात आणखीनंच भर पडलीय. या टॉय ट्रेनला विशेष डबा जोडण्यात आलाय. या डब्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यात. आरामदायी आसनव्यवस्था ठेवण्यात आलीय. शिवाय माथेरानच्या घाटाचं नयनरम्य दृश्यं डब्यातून बसल्याजागी पाहण्यासाठी एक टीव्हीही ठेवण्यात आलाय. या विशेष डब्यात फक्त सहा प्रवासी बसणार असून कुटुंब किंवा पर्यटकांच्या ग्रूपला याची बुकिंग करता येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक सुबोध जैन यांनी दिलीय.
मध्य रेल्वेनं माथेरान टॉय ट्रेनसाठी अभिनव योजना राबवण्यास सुरुवात केलीय. माथेरान रेल्वे अधिक प्रवासीभिमुख करुन तोट्यातली ही रेल्वे फायद्यात आणावी अशी मागणी होतेय.