www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनीही `घरचा आहेर` दिल्यानं उद्योगमंत्री नारायण राणेंची डोकेदुखी आणखी वाढलीय. राणेंनी सिंधुदुर्गातली काँग्रेस संपवली. आता जी अस्तित्वात आहे ती राणे समर्थक काँग्रेस आहे, असा तिखट हल्ला सावंत यांनी चढवलाय.
सिंधुदुर्गात वर्चस्वाची लढाई सुरू असून, राणे पदाशिवाय राहूच शकत नाही, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी पदाधिका-यांच्या राजीनाम्यानंतर, काँग्रेस नेते विजय सावंत यांनीही राणेंवर भडिमार केल्यानं, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नीलेश राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राणेंवर टीका करणा-या विजय सावंत यांच्या बंगल्याबाहेर राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
दरम्यान, सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नीलेश राणे यांचा प्रचार करणार का याबाबतची भूमिकेविषयी प्रतिक्षा कायम आहे. सोमवारी राष्ट्रवादी या प्रकरणात भूमिका जाहीर करणार होती. मात्र राष्ट्रवादी भूमिका जाहीर करण्याऐवजी सिंधुदुर्गातून तारीख पे तारीखचा सिलसिला चालू आहे. त्यामुळेच गोंधळ अधिकच वाढला आहे.
आघाडीचा धर्म पाळण्यासाठी निवडणूक प्रचारासाठी कोकण दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ११ एप्रिलला आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार १३ एप्रिलला सिंधुदुर्गचा दौरा करणार आहेत. जाहीर सभेतच्या माध्यमातून इथल्या पदाधिकाऱ्यांना येणारे नेते काय डोस पाजणार याची उत्सुकता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ