www.24taas.com, ठाणे
ठाण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी आणि आम आदमीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ट्राम रेल्वे सुरू करण्याचा नवा प्रस्ताव पुढे आला आहे. येत्या दीड वर्षात ‘लाईट रेल्वे ट्रान्सपोर्ट’ (एलआरटी) सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिलीय.
ट्राम गाड्या ब्रिटिश राजवटीत मुंबईत धावत होत्या. आता पुन्हा ठाण्यात या ट्राम गाड्या धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने पाऊले उचलण्यात आली आहेत. येत्या वर्षभरात प्रकल्पाची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एका खासगी संस्थेची निवड करण्यात येणार आहे. ही संस्था आपला अहवाल सादर करील. या अहवालानंतर निविदा काढून एका संस्थेची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती राजीव यांनी दिली.
या प्रकल्पासाठी ८०० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. आनंदनगर ते घोडबंदर या मार्गावर ट्राम धावेल. तर महत्वाच्या अंतर्गत रस्त्यांवर ट्राम सुरू करण्यात येणार आहे. मार्चनंतर खर्याव अर्थाने या प्रकल्पाला सुरूवात होईल. पहिल्या टप्याची सेवा २0१४ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. कोलकातामध्ये ज्या पध्दतीने ट्राम सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर एक ते दोन डब्यांची ही सेवा असेल. पहिल्या टप्यात गोखलेरोडवर ट्राम धावेल.
एलआरटीच्या प्रकल्पासाठी प्रत्येक किमीसाठी सुमारे ५0 ते ८0 कोटींचा खर्च अपेक्षित असून १0 किमीच्या कामासाठी सुमारे ८00 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील १६0 कोटींच्या खर्चाचा (२0 टक्के) भार महापालिका उचलणार आहे. उर्वरित खर्च हा पीपीपीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यास पुढील टप्याचा देखील विचार केला आहे.