www.24taas.com, मुंब्रा
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा इमोशनल अत्याचार आज मुंब्र्यातील एका स्थानिक सभेत नागरिकांना झेलावा लागला. बेकायदा बांधकामांच्या समर्थन प्रकरणी माफी मागितली आहे. बेकायदा बांधकामांचं मी कधीच समर्थन केलं नाही. पण त्या ठिकाणी राहत असलेल्यांच्या कळवळ्या पोटी बोललो असल्याचे आव्हाड यांनी जाहीर सभेत ढसाढसा रडून मुंब्र्यातील नागरिकांना पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
मुंब्र्यातील बेकायदा बांधकाम पाडू देणार नाही. वन अधिकाऱ्यांनी या भागात फिरकू नये, अशी धमकी जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. वन विभागाला पाठवलेले पत्र जाहीर झाल्यानंतर आव्हाड यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. या प्रकरणात माझं काही चुकलं असेल तर मी राजीनामा देईल, असेही आव्हाड यांनी हूमसून-हूमसून सांगितले. नाटक आणि चित्रपट व्यवसायातील व्यक्तींशी जवळचे संबंध असलेल्या आव्हाडांनी फूल्ल टू ड्रामेबाजी केली.
गेल्या २५ वर्षांपासून या मुंब्र्यावर बलात्कार झाला आहे. जितेंद्र आव्हाड याने पैसा खाल्ला आहे, हे कोणी सिद्ध करू दाखवावं. मला जर वाटले तर माझा मोबाईल बंद करून घरी बसेल, पण मला बदनाम करण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून या शहरात काही जण प्रयत्न करीत आहेत. मफतलालाची अडील लाख लोकवस्तीची झोपडपट्टी तोडण्याचे हायकोर्टाने आदेश दिले, पण मी २ तास तेथे थांबून त्या झोपडपट्टीला हात लावू दिला नाही. सामान्य माणसासोबत जाणे गुन्हा आहे तर तो गुन्हा मला मंजूर आहे. पण मी बदनामी सहन करू शकत नाही.