`मरे` विस्कळीत; कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी

कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 4, 2012, 11:35 AM IST

www.24taas.com, कल्याण
कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. त्यातच रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं रेल्वेचा आणि प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला होता. आता मात्र, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आलीय. रेल्वे वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत आहे.
रात्रीपासून कल्याण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रामबाग परिसरात पाणी साचायला सुरूवात झालीय. मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिरा सुरू आहे. त्यातच कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता मात्र सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यात आलीय. पण, अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.
सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे डेक्कन एक्स्प्रेस, इंदौर- पुणे एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्याही कल्याण स्टेशनजवळ उभ्या होत्या. लोकल्स वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्यामुळे कल्याण स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालीय. त्यातच इंडिकेटरही बंद असल्यानं प्रवाशांच्या समस्येत अजूनच भर पडलीय. लोक ट्रॅकमधून चालत स्टेशन गाठताना दिसत आहेत. कल्याण, ठाण्यात जोरदार पाऊस पडतोय तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरसह धरण परिसरात रिमझीम पाऊस सुरु आहे.
मुंबईत मात्र, पावसाचा जोर ओसरलाय. सोमवारी मुंबई स्टाईल हजेरी लावल्यानंतर पावसानं जराशी उसंत घेतलीय. मुंबईतली वाहतूक सुरळीत सुरू झालीय. मात्र, मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल आजही सुरूच आहेत. कल्याणच्या पुढेही एकही ट्रेन जात नसल्यानं लांबपल्ल्याच्या गाड्याही रखडल्या आहेत. पावसाचं पुनरागमन मुंबईकरांसाठी काहीसा सुखकारक आणि काहीसा त्रासदायकही ठरलंय.