www.24Taas.com, झी मीडिया, ठाणे
१७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी शिवसैनिकांना नतमस्तक होता यावं, यासाठी कायमस्वरुपी स्मृती उद्यानाचं बांधकाम वेगानं सुरू झालंय. तर दुसरीकडे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे जिल्ह्यात उद्याने आणि मैदानांची दूरवस्था झाली. ठाण्यातल्या टिकूचिनीवाडी उद्यानाची अत्यंत दयनीय अवस्था झालीय. उद्घाटनानंतर शिवसेना नेते इथं फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळं बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानासाठी लगबग आणि तत्परता दाखवणारे शिवसेना नेते टिकुचिनीवाडीतील या दूरवस्था झालेल्या उद्याना भेट देतील. तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी काय पावलं उचलण्यात येतील याकडं साऱ्याचं लक्ष लागलंय.
ठाणे महापालिका नेहमीच उद्याने, मैदाने वाचवतो. त्यांची निगा राखतो आणि नागरिकांनीही राखावी असे आवाहन पालिका करते. मात्र याच आवाहनाला खुद्द पालिकेनेचं हरताळ फासलाय. कारण ठाण्यातल्या टिकूचिनिवाडीजवळील एका निसर्ग उद्यानाची दूरवस्था झालीय. या उद्यानातली सर्वच खेळणी मोडकळीस आलीत. बाकं तुटलीत. वीजेची साधनं बंद तर झाडांचीही दूरवस्था झालीय. उद्यानात लावण्यात आलेले कारंजे आता मोडक्या वस्तूंसाठी गोदाम बनलंय.
उद्यानातील लाद्याही उखडल्या आहेत. त्याचा फटका वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जास्त सहन करावा लागतोय. याकडं पालिकेचं दुर्लक्ष होतंय.. विशेष म्हणजे शिवसेनेनं धुमधडाक्यात या मैदानाचं उदघाटन केलं होतं. उद्घाटनानंतर मात्र शिवसेनेनं याकडं पाठ फिरवलीय.
सत्ताधारी शिवसेनेच्या या भूमिकेमुळं सामान्य ठाणेकरांमधून संताप व्यक्त होतोय. झी मिडीयाने हा प्रकार उघड केल्यावर माहिती घेवून उपाययोजना करू असं पोकळ आश्वासन पालिका कर्मचारी देताना दिसत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.