वाशी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विजयी, पालघर पालिकेकडे लक्ष

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्रमांक 48 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी रमेश शिंदे यांचा दविजय झाला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा 290 मतांनी पराभव केला. तर पालघर नगरपरिषदेसाठी आज 74 टक्के मतदान झालं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 23, 2014, 11:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्रमांक 48 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी रमेश शिंदे यांचा दविजय झाला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा 290 मतांनी पराभव केला. तर पालघर नगरपरिषदेसाठी आज 74 टक्के मतदान झालं.
रोहिणी शिंदे यांना1413 तर सुरेश शिंदे यांना 1123 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये विरोधक विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना होता. आज सकाळी 7.30 वाजल्या पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली.वाशी सेक्टर-10 येथील सेंट मेरी हायस्कूलमध्ये ही मतदान प्रक्रीया पार पडली. मतदानाची वेळ संपेपर्यत एकूण 42 टक्के मतदान झाले.
पालघर नगरपरिषदेसाठी आज 74 टक्के मतदान झालं. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सात प्रभागातून 28 नगरसेवक निवडले जाणार असून त्यासाठी 122 उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनमध्ये बंद झालंय. पालघरमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतायत.
सत्तारुढ शिवसेनेला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनं कंबर कसलीये. तर पालघरचा विकास करु असा चंग बांधत बहुजन विकास आघाडी पक्षानंही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलल्यानं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय. सोमवारी मतमोजणी होणार असुन पालघरचा शिलेदार कोण होईल यांच्याकडे सर्वाचं लक्ष लागलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.